बेळगाव लाईव्ह :राज्यात पुन्हा कोरोना विषाणूने हातपाय पसरवण्यास सुरुवात केली असली तरी जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. तथापि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना युद्ध पातळीवर राबवल्या जाव्यात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय मूलभूत सुविधा सज्ज ठेवण्यात याव्यात. गर्भवती महिला, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी मास्क परिधान करावेत. शाळेतील आजारी मुलांना सुट्टी देऊन घरी पाठवावे, वगैरे सक्त सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केल्या आहेत.
कर्नाटकात मे महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात नव्याने 62 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज त्यांच्या कावेरी निवासस्थानी राज्यातील कोविड-संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्याच्या सल्लागार तज्ञांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते.
सर्व गर्भवती महिला, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी मास्क घालावेत. शाळेत येणाऱ्या मुलांना ताप, खोकला आणि इतर कोरोना लक्षणे आढळल्यास अशा मुलांना सुट्टी देऊन घरी पाठवावे, अशा कडक सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीत दिल्या. बैठकीमध्ये व्यापक सल्लामसलत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विविध खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले.
सध्या घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आपण पूर्णपणे तयार असले पाहिजे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि औषधे यासह सर्व मूलभूत सुविधा आताच तयार ठेवाव्यात. वृद्ध, गर्भवती महिला आणि हृदय आणि श्वसनाचे आजार असलेल्यांनी खबरदारी म्हणून मास्क घालावेत. याबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक कुशल जनजागृती कार्यक्रम राबवला गेला पाहिजे. परिस्थितीचा आढावा दर आठवड्याला किंवा दर तीन दिवसांनी घेतला पाहिजे. सर्व जिल्ह्यांमध्ये माहिती नियमितपणे गोळा करून साठवली पाहिजे. गर्भवती महिलांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवू नये.
त्यांच्यासाठी सर्व रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ताप, सर्दी किंवा खोकला असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. शैक्षणिक संस्थांनी यावर लक्ष ठेवावे आणि ॲलर्जीची लक्षणे असलेल्या मुलांना सुट्टी देऊन घरी पाठवावे. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रजा न घेता काम करण्यास तयार असले पाहिजे. जनतेच्या सोयीसाठी कोरोना हेल्पलाइन सुरू केल्या जाव्यात. सोशल मीडियाद्वारे जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली जावी, वगैरे सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आजच्या बैठकीत दिल्या.
दरम्यान, कर्नाटक राज्यात मे 2025 च्या या चौथ्या आठवड्यात एका गंभीर रुग्णासह एकूण नव्या 62 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शेजारील केरळ राज्यांमध्ये 95, तामिळनाडूमध्ये 66 आणि महाराष्ट्रात 56 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्यात सारी अर्थात गंभीर तीव्र श्वसन संसर्ग प्रकरणांचाही तपास सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळांवर स्क्रीनिंग केंद्र सुरू करण्याचा विचारही केला जात आहे.