बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेला कृष्णा सहकारी साखर कारखाना, विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यात असलेला नंदी सहकारी साखर कारखाना आणि इंडी तालुक्यात असलेला भीमा शंकर सहकारी साखर कारखाना यांना आवश्यक असलेल्या आर्थिक सहाय्यासाठी योग्य योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी दिले.
विजयपूर जिल्ह्याचे जिल्हा पालकमंत्री मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत तीन सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक सहाय्य कसे देता येईल यावर चर्चा झाली. या साखर कारखान्यांवर मोठा वित्तीय भार आहे.
अवधी कर्ज, शेतकऱ्यांना दिलेली रक्कम, ऊस कापणी, वाहतूक, साखरेचे उत्पादन आणि वीज उत्पादनासाठी लागणारा खर्च अधिक आहे. म्हणूनच राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) किंवा बँक खात्यांद्वारे या कारखान्यांना आर्थिक सहाय्य मिळवण्याची आवश्यकता आहे, असे अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.
कृष्णा सहकारी साखर कारखान्यास 192 कोटी रुपये, नंदी सहकारी साखर कारखान्यास 150 कोटी रुपये आणि भीमा शंकर सहकारी साखर कारखान्यास 130 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या रकमेचा उपयोग या कारखान्यांमधील वीज उत्पादनाच्या प्रकल्पावर तसेच कर्जफेड करण्यासाठी होईल, असे एम. बी. पाटील म्हणाले.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 27 मेगावॅट वीज उत्पादनासाठी कोझेन (सहवीद्युत) प्रकल्प सुरु करण्याची इच्छा दर्शविली आहे. तसेच नंदी सहकारी साखर कारखान्याने 37 मेगावॅट वीज उत्पादनासाठी कोझेन प्रकल्प सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासोबतच कृष्णा आणि भीमा साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन प्रकल्प सुरु करण्याच्या योजना बनविल्या आहेत. सहकारी तत्त्वावर आधारित या साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यामुळे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी साखर आयुक्त व एनसीडीसी अधिकार्यांसोबत विस्तृत चर्चा करून यावर योग्य मार्गदर्शन केले आहे. यावरून साखर कारखान्यांना आवश्यक त्या कर्जाचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल, अशी आश्वासने पाटील यांनी दिली.
या बैठकीत मंत्री एच. के. पाटील, शिवानंद पाटील, एच. सी. महादेवप्पा, इंडीचे आमदार यशवंतराय गौड पाटील, बीळगीचे आमदार जे. टी. पाटील, सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनिश, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव एल. के. अतिक, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता, वित्त विभागाचे सचिव पी. सी. जाफर, नंदी साखर कारखान्याचे अध्यक्ष कुमार देसायी जैनापूर, निजलिंगप्पा साखर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजगोपाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.