मान्सून व्यवस्थापनासाठी मनपात संयुक्त बैठकधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून साफसफाई करा; महापौर मंगेश पवार यांचे निर्देश
बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेने मान्सूनपूर्व तयारीसाठी कंबर कसली आहे. महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका, वनविभाग, हेस्कॉम आणि झाडे तोडणाऱ्या कंत्राटदारांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.
यावेळी महापौर मंगेश पवार यांनी अधिकाऱ्यांना नुकसान होण्यापूर्वीच जागे होऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. “नुकसान होण्यापूर्वीच उपाययोजना करा,” असे त्यांनी बजावले. शहरातील विद्युत तारा आणि धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले. अशा झाडांचे ‘एबीसी’ श्रेणींमध्ये वर्गीकरण करून नुकसान टाळण्यासाठी आधीच काळजी घेण्याचे आवाहन महापौरांनी केले.
महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील पडू शकणाऱ्या आणि तोडणीयोग्य झाडांचे सर्वेक्षण करून त्यांना हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, पावसाळ्यासाठी एक हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी १५,००० मीटरपेक्षा जास्त लांबीच्या गटारांची साफसफाई करण्यात आली आहे. यू.जी.डी. मशीन, नवीन जेटिंग मशीन, सक्शन मशीन आणि यू.जी.डी. वाहनांसह पथके तयार करण्यात आली आहेत.
पाऊस आणि गुरेढोरे यांच्यामुळे होणाऱ्या नुकसानीची नोंद घेण्यासाठीही विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय, कोविड-संबंधित निर्बंध अजूनही लागू असून, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपाययोजना केल्या जात आहेत. जनतेमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला महानगर प्रशासकीय पक्षाचे नेते हणमंत कोगळी, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, विभागीय वनसंरक्षक पुरुषोत्तम, उपविभागीय वन अधिकारी विनय गौडा, हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


