बेळगाव लाईव्ह : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (केसीईटी) मध्ये सरकारी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि पदविका पूर्व शिक्षण विभागाच्या वतीने मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, “शासकीय विद्यार्थ्यांनी ‘सक्षम’ कार्यक्रमातून अतिशय चांगली कामगिरी केली असून, हे उपक्रम भविष्यात आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाईल. ‘सीईटी सक्षम’ या विशेष प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून ६१ विद्यार्थ्यांनी ५० हजार रँकच्या आत प्रवेश मिळवला आहे.
गेल्या वर्षी फक्त ४ विद्यार्थीच हे यश मिळवू शकले होते, मात्र यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील १८ आणि चिकोडीतील ४३ विद्यार्थी आहेत. मंत्री जारकीहोळी यांनी शालेय व महाविद्यालयीन मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रत्येक तालुक्यात दोन शाळा आणि दोन महाविद्यालयांसाठी प्रत्येकी पाच कोटी, असा एकूण दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमात आमदार आसिफ सेठ यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. “शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. उत्तम शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा गरजेच्या आहेत. सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले.
जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी ‘सक्षम’ उपक्रमाचे यश मांडताना सांगितले की, ग्रामीण व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा ‘लक्षात’ म्हणजे १ लाख रँकच्या आत ९५ विद्यार्थी तर ५० हजारच्या आत ६१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
या वेळी माजलट्टी कॉलेजचे प्राचार्य, विद्यार्थिनी शिवानी, शिल्पा पाटील (बैलहोंगल) यांनी आपल्या अनुभवातून ‘सक्षम’ उपक्रमामुळे झालेल्या फायद्यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात रायदुर्गचे आमदार दुर्योधन आयहोळे, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा हमी योजनांचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी मान्यवर उपस्थित होते.