बेळगाव लाईव्ह :राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात (एनएमसी) मूल्यांकनकर्ता म्हणून काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरला बेळगाव येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींकडून 10 लाख रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहात पकडून अटक केली आहे.
बेळगाव येथील वैद्यकीय संस्थेच्या अनुकूल तपासणी अहवालाच्या बदल्यात ही लाच घेण्यात आल्याचा आरोप आहे. या बेकायदेशीर व्यवहाराची माहिती मिळताच सीबीआयने तातडीने कारवाई करत सापळा रचला आणि डॉक्टरला अटक केली.
सदर अटकेसोबतच कोलकाता, वर्धमान आणि बेळगावसह अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 44.6 लाख रुपयांची अतिरिक्त बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.
सीबीआयने 24 मे 2025 रोजी आरोपी वरिष्ठ एनएमसी मूल्यांकनकर्ता, दोन स्थानिक व्यक्ती आणि बेळगाव मधील संबंधित वैद्यकीय संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआय तपासातील आरोपानुसार संस्थेच्या अधिकृत तपासणीदरम्यान अनुकूल अहवाल प्रमाणित करण्यासाठी संबंधित वरिष्ठ डॉक्टरने लाच मागितली आणि स्वीकारली. सीबीआय पथकांनी आरोपी व्यक्तींच्या निवासी आणि कार्यालयीन जागेत व्यापक झडती घेतली. या झडतीमध्ये एकूण 54.6 लाख रुपये रोख, बेकायदेशीर कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे आढळून आले आहेत.


