बेळगाव लाईव्ह :आपल्या उत्तराखंड ते महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 पावन गडकिल्ले सायकल यात्रेला प्रारंभ केलेल्या उत्तराखंड येथील कार्तिक सिंग या शिवभक्त युवकाचे आज बेळगावात आगमन झाले असून त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
आपल्या सायकलवरील महाराजांची प्रतिमा असलेल्या भगव्या ध्वजासह बेळगावात दाखल झाल्यानंतर शिवभक्त कार्तिक सिंग याने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आपल्या सायकल मोहिमेबद्दल माहिती दिली. त्याने सांगितले की, उत्तराखंड येथून मी गेल्या 24 डिसेंबर 2024 रोजी यात्रेला प्रारंभ केला असून आज त्याला 5 महिने 6 दिवस झाले आहेत.
याखेरीज या दरम्यान मी 5000 हजार किमी अंतराचा प्रवास पूर्ण केला आहे. या दरम्यान मी महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर वगैरे ठिकाणांसह विविध ठिकाणच्या शिवकालीन 64 गडकिल्ल्यांना भेट दिली आहे. दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला कधी शिकवलं गेलं नाही. त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नाही. आम्हाला फक्त मुघल सम्राटांच्या बद्दलच माहिती देण्यात आली. तेंव्हा आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भावी पिढीला माहिती देणे ही आपली जबाबदारी बनते.
गडकिल्ल्यांना भेटी दिल्यानंतर त्याकाळचे वातावरण जीवनशैली कशी असावी याची कल्पना येते. युवा पिढीला माझा संदेश आहे की गडकिल्ल्यामध्ये जाऊन आपला इतिहास नष्ट करू नका. माझ्या भ्रमंती दरम्यान माझ्या निदर्शनास आले की ज्या गडकिल्ल्यांजवळ नागरी वसाहत आहे त्याच किल्ल्यांचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात येऊ लागले आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गडकिल्ल्यांचे रक्षण करून त्यांचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे कार्तिक सिंग याने स्पष्ट केले.

उत्तराखंड ते महाराष्ट्र या माझ्या सायकल मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 पावन गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा मी संकल्प केला आहे. आतापर्यंत 64 गडकिल्ल्यांची भ्रमंती मी केली असून उर्वरितांची भ्रमंती पूर्ण करण्यासाठी मला वर्षभराचा तरी कालावधी लागणार आहे. माझ्या या सायकल मोहिमेदरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी मला स्थानिक लोकांकडून आवश्यक मदत मिळते.
दररोज सकाळी मी 8 वाजता सायकल प्रवासाला सुरुवात करून सायंकाळी 6 -7 वाजता तो थांबवतो. या भागातील गडकिल्ल्यांना भेटी देण्यासाठी आज मी महिपालगडावरून बेळगावमध्ये आलो असून येथे तीन-चार दिवस थांबणार आहे. या ठिकाणी श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेकडून मला खूप चांगली मदत मिळत आहे. येथील गडकिल्ल्यांना भेटी दिल्यानंतर मी रायगडाला भेट देणार आहे.
त्या ठिकाणी येत्या 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. तो सोहळा चित्रीत करून तो मी संपूर्ण देशाला दाखवणार आहे असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त गडकिल्ल्यांना मी भेटी देणार नाही तर त्यांची व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आठ -आठ फुटाची मूर्ती मला बनवायची आहे. त्यासाठी प्रत्येक गडकिल्ल्यांवरील माती मी संग्रहित करणार असून त्यासाठी पुन्हा एकदा मोटरसायकलने प्रवास करणार आहे, असा मनोदय कार्तिक सिंग याने शेवटी व्यक्त केला.