बेळगाव लाईव्ह :थायलंड मधील पटाया येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील बेळगावचा सुवर्णपदक विजेता शरीर सौष्ठवपटू विनोद मेत्री आणि आंतरराष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले राजेश लोहार या उभयतांचे बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स व श्रीराम सेना हिंदुस्थानसह बेळगावातील विविध संघटनांतर्फे आज सकाळी उत्स्फूर्त स्वागत करून जंगी जाहीर सत्कार करण्यात आला.
शहरातील धर्मवीर छ. संभाजी महाराज चौक येथे आज बुधवारी सकाळी महाराजांच्या मूर्ती समोर आयोजित या सत्कार समारंभापुर्वी शरीर सौष्ठवपटू विनोद मैत्री आणि आंतरराष्ट्रीय पंच राजेश लोहार जंगी स्वागत करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुणे कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे अध्यक्ष संजय सुंठकर, श्री रामसेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, दलीत नेते मल्लेश चौगुले, अनिल अमरोळी, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, मराठा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पवार, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, नारायण चौगुले, प्रविण कणबरकर, जितेंद्र काकतीकर, प्रेमनाथ नाईक,गणेश दड्डीकर, आकाश हलगेकर, विनोदची आई सुमन मेत्री, पत्नी गिरीजा मेत्री या मान्यवरांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे अनिल अमरोळी यांनी खेळाडूंच्या कार्याची माहिती दिली. तसेच संघटनेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विनोद मेत्री व राजेश लोहार यांचा फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्याबरोबरच उपस्थित क्रिडाशौकिनाना मिठाई वाटण्यात आली.
याप्रसंगी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी समस्त शहरवासीयांतर्फे सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. बेळगावच्या युवा पिढीने व्यसनाच्या आहारी न जाता खेळांच्या माध्यमातून आपले आरोग्य तंदुरुस्ती ठेवावे खेळामध्ये आपले, आपल्या गावाचे नाव उज्वल करावे असे सांगून विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे यश बेळगांवच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास कोंडुसकर यांनी व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांपैकी दलित नेते मल्लेश चौगुले व अन्य काहींनी समायोचीत विचार व्यक्त करून मेत्री व लोहार यांना शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती शरीर सौष्ठवपटू विनोद मेत्री यांनी यावेळी बोलताना इतके भव्य स्वागत मला अपेक्षित नव्हते माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत असे सांगून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स, अस्मिता क्रिएशन ग्रुपचे पदाधिकारी, एसएसएस स्पोर्टस फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी व बेळगांवातील विविध संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सत्कार समारंभनंतर खुल्या जीपमधून शरीर सौष्ठवपटू विनोद मैत्री आणि आंतरराष्ट्रीय पंच राजेश लोहार यांची शहराच्या विविध भागात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील वीरराणी चन्नम्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री उभा हनुमान, श्री बसवेश्वर महाराज, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अनगोळ येथील श्री धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विविध ठिकाणी शहरवासीयांनी विनोद मेत्री व राजेश लोहार यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत व अभिनंदन केले.