बेळगाव लाईव्ह : तारांगण, रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाइट आणि श्रीराम इनोव्हेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरात महिलांसाठी पारंपरिक वेशभूषेत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. महिलांना सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला शहरातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
महिलांनी पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून रॅलीत भाग घेतला होता. मराठी संस्कृती, पेशवाई परंपरा, वारकरी संप्रदाय अशा विविध पारंपरिक वेशभूषांमध्ये महिला सहभागी झाल्याने रॅलीला सांस्कृतिक रंग प्राप्त झाला होता.
रॅलीची सुरुवात बेळगाव येथील रामनाथ मंगल कार्यालयापासून झाली. आर.पी.डी. रस्ता, गोवावेस सर्कल मार्गे पुन्हा रामनाथ मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेच्या आधारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुष्पा दत्ता जाधव, द्वितीय क्रमांक तेजश्री हंडे आणि तृतीय क्रमांक प्रिया बेडके यांनी पटकावले.

याशिवाय राजश्री हावळ आणि ज्योती कांगले यांना विशेष पारितोषिकाने गौरवण्यात आले. अपर्णा हळदणकर, अंजली पेडणेकर आणि संगीता गायडोळे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.
कार्यक्रमात कर्नाटक शासनाकडून यशस्वी उद्योजक म्हणून सन्मानित झालेल्या जयदीप बिर्जे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या उद्योजकीय कार्याची माहिती देत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. रोटरी क्लब ऑफ बेलगाम इलाइटचे अध्यक्ष सचिन हंगिरकर यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर ठेवला.
या रॅलीसाठी परीक्षक म्हणून मोहिनी कुलकर्णी आणि अलीशा पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच, डॉ. अनुपमा जोशी यांनी महिलांना वाहतुकीतील सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करत त्यांच्या सशक्तीकरणासाठी उपयुक्त सूचना दिल्या. तारांगण संस्थेच्या वतीने अरुणा गोजे पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत महिलांनी केवळ सांस्कृतिक नव्हे तर सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रीय सहभाग घ्यावा, असे आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधा माणगावकर, स्मिता मेंडके, सविता वेसणे, सविता चिल्लाल, जयश्री दिवटे, अर्चना पाटील यांचा मोलाचा सहभाग होता. रोटरी क्लबचे अनेक सदस्यही या उपक्रमाला उपस्थित होते. या रॅलीचे सुरेख सूत्रसंचलन प्रा. मनिषा नाडगौडा आणि रोशनी हुंदरे यांनी केले.