बेळगाव लाईव्ह : खानापूर-पारिश्वाड मार्गावर शांतीनिकेतन शाळेजवळील कुपटगिरी क्रॉस भागात दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत एक १७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा युवक किरकोळ जखमी झाला आहे सोमवारी ही घटना घडली आहे.
अपघातानंतर दोघांनाही तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र एका युवकाचा वाटेतच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय वैजनाथ येळ्ळूर (वय १७, रा. देवलत्ती) असे मृत युवकाचे नाव आहे. तो मूळचा हिरेमुनवळ्ळी येथील असून सध्या देवलत्तीत वास्तव्यास होता.
संजय आपल्या मित्रांना घेण्यासाठी खानापूरहून पारिश्वाडकडे जात असताना त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवर आदळली.
या धडकेत संजय गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने खानापूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील नागुर्डा येथील विठ्ठल नारायण महाजन याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.