बेळगाव लाईव्ह :बेळगावात शिवसैनिकांची ओळख म्हणजे… जिथे मराठी माणूस तिथं शिवसैनिक असणारच..अशाच बेळगावातील एका कट्टर शिवसैनिकाची एक्झिट मनाला चटका देणारी ठरली.
शुक्रवारी रात्री 10 वाजता बेळगाव शिवसेना उपशहर प्रमुख, समर्थ नगर येथील पंच प्रकाश बंडू राऊत वय 52 रा. मूळ गाव बडस, सध्या राहणार समर्थनगर बेळगाव यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्य संस्कार केले जाणार आहेत.
मूळचे बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील बडस या गावचे प्रकाश राऊत. व्यवसायानिमित्त बेळगाव मध्ये समर्थ नगरला येथे ते स्थायिक होते. बापटगल्लीत त्यांचं डिश टीव्ही विक्रीचे छोटेसे दुकान होते.
सुरुवातीच्या काळात कामा निमित्त जवळपास 15 ते 20 वर्ष त्यांनी मुंबईत काढली होती त्यावेळी ते शिवसेनेच्या संपर्कात आले . मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या वार्डात ते राहत होते. त्यामुळे त्यांच्याशी त्यांची जवळीक होती. बेळगाव सीमा प्रश्नाचा किंवा बेळगावच्या मराठी माणसाच्या प्रश्नाला चालना देण्यासाठी मुंबईचे आमदार सुनील शिंदे माजी आमदार दगडू सपकाळ आणि शिवसेनेच्या आमदारांशी ते थेट संपर्क करत होते. बेळगावात जेवढे शिवसैनिक आहेत त्यापैकी एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची प्रामाणिक राहिले अशा या बेळगावच्या कट्टर शिवसैनिकाची एक्झिट झाली आहे.

90 च्या दशकात मराठी माणसाचे हक्क आणि मराठी माणूस यासाठी शिवसेना मुंबईत पेटून उठली होती, मुंबईच्या मराठी माणसाचा श्वास आणि हृदयाची धडकन म्हणजे शिवसेना होती. हालगीवर कडाडती टिपरी पडावी तशी शिवसेना धडधडत होती. त्यावेळी प्रत्येक शिवसैनिक हा जीवंत स्फोटक बॉम्ब होता त्यावेळी बेळगाव तालुक्यातील बडस येथील प्रकाश राऊत नैसर्गिक रित्या शिवसेनेच्या या चुंबकीय वातावरणाकडे खेचला गेला. कट्टर शिवसैनिक झाला !!
शिवसेना म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर प्रकाश राऊत यांच्या सारख्या निधड्या शिवसैनिकला भेटलं पाहिजे अशी राऊत यांची ओळख…
राऊत यांच्या धमन्यात शिवसेना वहायची भगव्यासह पिसाट कसं व्हायचं हे प्रकाश राऊत यांना माहीत होतं. हा आवाज कुणाचा… शिवसेनेचा.. या किलकारी बरोबर उसळायचा प्रकाश राऊत…
बेळगाव महाराष्ट्रात गेल पाहिजे यासाठी झुरायचा प्रकाश राऊत…अश्या मराठी माणसासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला अखेरचा सलाम..