बेळगाव लाईव्ह :कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी सरकारने भूसंपादनाचा अध्यादेश बजावला असून त्यामध्ये कित्तूर आणि बेळगाव तालुक्यातील कांही गावांचा समावेश करण्यात आला आहे. बेळगाव तालुक्यातील 3 तर कित्तूर तालुक्यातील 12 गावांमध्ये रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे.
प्रवासाचा कालावधी कमी व्हावा व इंधनाची बचत व्हावी या उद्देशाने बेळगाव -धारवाड व्हाया कित्तूर असा नवा रेल्वे मार्ग केला जाणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात 407 एकर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. हा एकूण 73 कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असणा असून करविनकोप, बागेवाडी, एम. के. हुबळी, हुलीकट्टी, कित्तूर, तेगुर, मम्मीगट्टी आणि कऱ्याकोप्प अशी नवीन रेल्वे स्थानके तयार करण्याचा प्रस्ताव आहे.
पहिल्या टप्प्यात कित्तूर व बेळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी केआयडीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भूसंपादनासाठीचा अध्यादेश बजावला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कित्तूर तालुक्यातील गावांचा अधिक प्रमाणात समावेश करण्यात आला आहे.
बेळगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी या रेल्वे मार्गाला विरोध केल्यामुळे येथील भूसंपादन दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील बागेवाडी, मुत्नाळ, हुलीकट्टी, तर कित्तूर तालुक्यातील मरीगेरी, शिवनूर, निच्चनकी, कित्तूर, बसापुर, शिगीहळ्ळी के. ए., उगरखोड, होनीदिब्ब, हुलीकट्टी के. ए., हुंचीकट्टी, काद्रोळी व एम. के. हुबळी या गावांचा अध्यादेशात समावेश आहे.