बेळगाव लाईव्ह : संती बस्तवाड येथील धर्मग्रंथ विटंबना प्रकरणी पोलीस आयुक्तांनी सखोल चौकशी करून प्रकरणाची सत्यता बाहेर काढून आरोपींना गजाआड करण्याचे आश्वासन दिले आहे. गुरुवारी सायंकाळी बेळगाव येथे मुस्लिम बांधवांच्या सोबत बैठकीत ते बोलत होते.
बेळगाव तालुक्यातील संतिबस्तवाड येथे सोमवारी एका प्रार्थनास्थळातील धर्मग्रंथाला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी बेळगावात सायंकाळी निदर्शने केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तातडीने तीन विशेष पथके तयार करून आरोपींना तीन दिवसांत अटक करण्याचे आश्वासन दिले होते आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
गेल्या सहा महिन्यांपासून संतिबस्तवाडमध्ये लहान-मोठ्या अशांततेच्या घटना घडत होत्या, ज्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि गावकऱ्यांशी चर्चा करून आरोपींना लवकरच पकडण्याचे आश्वासन दिले. मात्र, या घटनेनंतर बेळगावातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने संतिबस्तवाडकडे धाव घेतली आणि परत येताना व्हीटीयू तसेच राणी चन्नम्मा सर्कल येथे धरणे आंदोलन केले. आज, या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मुस्लिम समाजाच्या नेत्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग बोलताना म्हणाले, संतीबस्तवाड प्रकरणामध्ये पोलीस विभाग गंभीरतेने तपास करत आहे. काल घडलेल्या घटनेनंतर संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी चन्नम्मा चौकात आंदोलन केले, त्यावेळी आम्ही त्यांना लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आम्ही आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
संतीबस्तवाड प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून याचा सखोल तपास करणे अत्यंत गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेरे का तोडण्यात आले? ते कोणी तोडले? या कृत्यामागे कोणाचा हात आहे आणि यामागचा नेमका उद्देश काय होता, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे. या दृष्टीने, संतीबस्तवाड गावात गेल्या सहा महिन्यांपासून घडलेल्या विविध लहान-मोठ्या घटनांचाही आढावा आम्ही घेत आहोत. संतीबस्तवाडमधील या घटनेनंतर हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन खऱ्या आरोपीला पकडून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे, त्यानुसार आमचा तपास त्याच दिशेने सुरू आहे, असे पोलीस आयुक्त म्हणाले.

प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि सत्यता पडताळण्यासाठी अजूनही अधिक तपासाची गरज आहे. कोणताही निष्पाप व्यक्ती आरोपीच्या पिंजऱ्यात अडकू नये, या प्रकरणातील खऱ्या आरोपीला अटक करण्यात यावे, याची काळजी आम्ही घेत आहोत. गेल्या महिन्यात मिनार तोडफोडीची जी घटना घडली होती, त्यातील चार आरोपींना आम्ही ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्याच पद्धतीने, संतीबस्तवाड प्रकरणाचाही आम्ही विविध अंगांनी बारकाईने तपास करत आहोत. कोणत्याही निरपराध व्यक्तीला त्रास होऊ नये आणि खरा दोषी समोर यावा, आमचा उद्देश केवळ एवढाच आहे. यासाठी पोलीस विभाग पूर्णपणे प्रयत्नशील आहे. तोपर्यंत, मी सर्वांना शांतता राखण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे नम्र आवाहन करतो, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
या बैठकीत मुस्लिम समाजातील नेत्यांनी देखील आपले विचार व्यक्त करत लवकरात लवकर सत्य शोधून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.