बेळगावात दुसऱ्या दिवशीही वळिवाची ‘धुलाई’!

0
1
Rain
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात कालप्रमाणेच आजही वळीवाने जोरदार हजेरी लावली. तर, तालुक्यातील उत्तर भागाला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मान्सूनपूर्व या पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले असले तरी, मशागतीच्या कामांना मात्र चांगली गती मिळाली आहे. या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी झाला असून, शेतीच्या कामांना सुरुवात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे वातावरण अत्यंत पोषक ठरले आहे.

आज शहरात किमान तापमान २३ अंश सेल्सियस आणि कमाल तापमान ३६ अंश सेल्सियस नोंदले गेले, ज्यामुळे दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि पावसाला सुरुवात झाली. बेळगाव तालुक्याच्या उत्तर भागात, विशेषतः काकती, कडोली, होनगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, केदनूर, बबरगा आणि आसपासच्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर गटारांमधील पाणी रस्त्यावर आल्याने काही प्रमाणात कचरा वाहतूक झाली.

हा पाऊस मान्सूनपूर्व असला तरी, शहर आणि परिसरात त्याने चांगली हजेरी लावल्याने उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दरम्यान, राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने त्यांच्या एक्स (ट्विटर) खात्यावर पुढील सात दिवसांचा हवामान अंदाज जारी केला आहे. त्यानुसार, आजपासून १६ मे पर्यंत राज्यभरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उर्वरित दिवसांमध्येही हलक्या ते मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

 belgaum

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १६ मे पर्यंत शहरात पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. शहरातील अजमनगर, नेहरूनगर, महांतेशनगर, शाहूनगर, वैभवनगर, बॉक्साईट रोड यासह इतर भागांमध्ये आणि मध्यवर्ती शहरात पावसाने हजेरी लावली.

काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी केवळ हलका शिडकावा जाणवला. मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या उष्म्यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र, अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांनी रेनकोट आणि छत्रीचा वापर करणे सुरू केले आहे. हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.