बेळगाव लाईव्ह : मंगळूर येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी याच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगाव उत्तर भारतीय जनता पक्षातर्फे आज शनिवारी सकाळी शहरात आंदोलन छेडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेस सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली.
हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी यांच्या काल झालेल्या हत्येच्या आणि राज्यातील काँग्रेस सरकारच्या निषेधार्थ आज शनिवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे बेळगाव उत्तर भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी चन्नम्मा सर्कल येथे धरणे सत्याग्रह करत मयत सुहास शेट्टी याला न्याय मिळावा, त्याच्या हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे या मागणीसह राज्यातील काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या धिक्काराच्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
हातात पक्षाचे ध्वज आणि निषेधाचे फलक घेऊन जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी करत त्यांच्या पोस्टरचे चौकात दहन करून आपला संताप व्यक्त केला.
याप्रसंगी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप महिला नेत्या उज्वला बडवानाचे म्हणाल्या की, हिंदू लोकांच्या या पद्धतीने हत्या यापूर्वी मुस्लिम पुरुषांकडून केल्या जात होत्या. मात्र काल सुहास शेट्टी यांची हत्या करण्यामध्ये महिलांचा देखील सहभाग दिसून आला आहे. यावरून पीएफआय संघटनेमध्ये महिला देखील सक्रिय आहेत हे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे सुहास शेट्टी यांना दोन महिन्यापूर्वी इंस्टाग्राम वरील पोस्टद्वारे बदला घेण्याची धमकी मिळाली होती.

या संदर्भात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार देखील केली होती. तथापि पोलीस त्याची दखल न घेता निष्क्रिय राहिल्यामुळेच शेट्टी यांना जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे शेट्टी यांच्या हत्येच्या कटात पोलीस देखील सहभागी आहेत का? असा प्रश्न पडतो. तसेच या हत्याच्या बाबतीत पोलिसांनी अद्यापही कोणतीच कारवाई केलेली नाही. याखेरीज राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार कर्नाटकमध्ये फक्त मुस्लिमच राहतात. त्यामुळे त्यांची मते मिळाली की बस् आपण आरामात सरकार चालवू होऊ शकतो या भ्रमात आहे. मात्र त्यांनी लक्षात घ्यावे की हे सर्व राज्यातील जनता पहात आहे असे सांगून हिंदुस्थानमध्ये कर्नाटक आहे, पाकिस्तानमध्ये नाही हे लक्षात ठेवून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पाकिस्तानात जावे, असे परखड मत बडवानाचे यांनी व्यक्त केले. अन्य एक महिला नेत्या शिल्पा केंकर यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ता सुहास शेट्टी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही आज आंदोलन करत आहोत. आपल्या राज्यात दिवसेंदिवस जिहादी मानसिकता वाढत चालली आहे. हिंदू लोकांच्या हत्या केल्या जात असून याबाबतीत राज्यातील काँग्रेस सरकार काहीच न करता मूग गिळून गप्प बसले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राज्यातील परिस्थिती हाताळणे जमत नसल्यामुळे त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे असे सांगून हिंदूंच्या हत्या जर ताबडतोब थांबवल्या गेल्या नाहीत तर आम्ही यापेक्षा देखील उग्र आंदोलन छेडू नका असा इशारा दिला.


