बेळगाव लाईव्ह : येथील एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने वकील श्रीधर कुलकर्णी यांच्यावर कथित हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज बेळगाव वकील संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. वकील संघटनेच्या वतीने शहरातील वकिलांनी एकत्र येत पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक भेट देत पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. या घटनेतील दोषी पोलीस अधिकारी सुनगार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वकिलांनी केली आहे.
घडलेल्या प्रकारानुसार, ॲडव्होकेट श्रीधर कुलकर्णी हे त्यांच्या एका अशीलांसोबत कोर्टाच्या आदेशानुसार, सरफेसी कायद्यांतर्गत पोलीस संरक्षणाची मागणी करण्यासाठी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. त्यावेळी स्टेशन हाऊस ऑफिसर सुनगार यांनी कुलकर्णी यांच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही, उलट त्यांना अपमानास्पद भाषेत उत्तर दिल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर, सुनगार यांनी कुलकर्णी यांच्यावर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर ॲडव्होकेट श्रीधर कुलकर्णी यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ केली, असा दावा वकील संघटनेने केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या वकील संघटनेने आज थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आणि दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

निवेदन देण्यासाठी गेलेल्या वकिलांच्या शिष्टमंडळाशी पोलीस आयुक्तांनी चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली, असे वृत्त आहे. मात्र, केवळ सॉरी बोलून चालणार नाही, तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वकिलांनी लावून धरली आहे.
बेळगाव वकील संघटनेने या निवेदनात यापूर्वी घडलेल्या एका घटनेचाही उल्लेख केला आहे. त्यानुसार, यापूर्वीचे पीएसआय अरळीकट्टी यांनी कोर्टाच्या आदेशानुसार आवश्यक कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती, याची माहितीही आयुक्तांना देण्यात आली आहे.
वकील संघटनेने पोलीस आयुक्तांना केलेल्या मागणीमध्ये दोषी पोलीस अधिकारी सुनगार यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करून कठोर कारवाई करण्याची प्रमुख मागणी आहे. यासोबतच, बेळगावातील सर्व पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी वकिलांशी योग्य वर्तन ठेवावे आणि कोर्टाच्या आदेशांचे पालन करावे, असे निर्देश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.