बेळगाव लाईव्ह : जिल्हा बाल भवन प्रगती आढावा बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी २१ दिवसांत लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज जिल्हा परिषद कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थायावरून ते बोलत होते.
या वेळी बाल भवन खात्याचे लेखापरीक्षण जिल्हा परिषद सहाय्यकांच्या सहकार्याने आणि महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयाने पार पाडण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
श्रीनगरजवळील जुन्या बाल भवनच्या भूखंड व इमारतीसंदर्भातील सर्व तपशील, तसेच ती जागा भाड्याने देण्याच्या शक्यता यांचे सविस्तर विवरण सादर करावे, असे त्यांनी निर्देशित केले. याच ठिकाणी बॉक्स क्रिकेट मैदान तयार करून उत्पन्न वाढवता येईल आणि मुलांनाही त्याचा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.
एनसीसी ग्राउंडजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन बाल भवन इमारतीच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी निर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांना नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
या बैठकीस जिल्हा बाल भवनचे सचिव, महिला व बालविकास उपसंचालक आर. नागराज, तसेच कन्नड व संस्कृत विभागाच्या उपसंचालिका विद्या भजंत्री आणि निर्मिती केंद्राचे प्रकल्प संचालक शेखर उपस्थित होते.