बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या क्लब रोडचे लवकरच ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बी. शंकरानंद यांच्या नावे ‘शंकरानंद मार्ग’ असे नामकरण करण्यात येणार आहे. बी. शंकरानंद जन्मशताब्दी उत्सव समितीने त्यांचे पुत्र प्रदीप कणगली यांच्या नेतृत्वाखालील येत्या शनिवारी हा अधिकृत नामकरण समारंभ आयोजित केला आहे.
बी. शंकरानंद यांनी 1967 ते 1996 पर्यंत 29 वर्षे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्याच ठिकाणाहून त्यांनी सलग 7 वेळा विजय मिळवत एक प्रकारचा विक्रम रचला. त्याचप्रमाणे दोन दशकांहून अधिक काळ केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. त्यांनी श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाखाली कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले.
केंद्रीय मंत्रिमंडळात बी. शंकरानंद यांनी भूषवलेली पदे व कालावधीच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत. संसदीय कामकाज उपमंत्री 16 मार्च 1971 ते 24 मार्च 1977. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री 16 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984. शिक्षण मंत्री 14 जानेवारी 1980 ते 17 ऑक्टोबर 1980. सिंचन आणि वीज मंत्री 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985. जलसंपदा मंत्री 25 सप्टेंबर 1985 ते 21 ऑगस्ट 1987, 25 जून 1988 ते 2 डिसेंबर 1989. कायदा आणि न्याय मंत्री 25 जून 1988 ते 2 डिसेंबर 1989. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री 21 जून 1991 ते 17 जानेवारी 1993. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री 18 जानेवारी 1993 ते 22 डिसेंबर 1994.(स्रोत – विकिपीडिया.)
बी. शंकरानंद यांच्या स्थानिक प्रदेश आणि राष्ट्रासाठीच्या कायमस्वरूपी योगदानाची दखल घेत बेळगाव महानगरपालिकेने (बीसीसी) 2024 मध्ये त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्लब रोडचे नांव बदलण्याचा एक ठराव एकमताने मंजूर केला आहे. त्यानुसार बी. शंकरानंद जन्मशताब्दी उत्सव समितीने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत नामकरण समारंभाची घोषणा केली.
यावेळी बोलताना शंकरानंद यांचे चिरंजीव प्रदीप कणगली यांनी दिवंगत नेत्याच्या निवासस्थानाजवळील क्लब रोड सर्कल येथे बी. शंकरानंद यांच्या पुतळ्याची पायाभरणी केली जाईल. तसेच या कार्यक्रमाला कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित राहतील, असे सांगितले.