बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात ओला, उबर, रॅपिडो, यात्री वगैरे आधुनिक प्रवासी सेवा सुरू करण्यास परवानगी देऊ नये या मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन आज उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघातर्फे मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघातर्फे राज्याध्यक्ष शेखरय्या मठपती, कार्याध्यक्ष बाबाजान बळगानूर आणि सरचिटणीस जीवन उक्तूरी यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपरोक्त निवेदन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. अलीकडे राज्यात शक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून ऑटोरिक्षा चालकांचा उदरनिर्वाह चालणे कठीण झाले आहे. नवी ऑटो रिक्षा घेतलेल्यांना कर्जाचे हप्ते भरणे कठीण जात आहे.
बेळगाव शहरांमध्ये सुमारे 10 हजार ऑटो रिक्षा निरंतर जनसेवा करत असतात. तथापि लोकसंख्येनुसार अन्य खाजगी प्रवासी वाहनांची संख्या वाढल्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना प्रवासी भाडे मिळणे कठीण होत चालले आहे. यात भर म्हणून ओला, उबर, रॅपिडो, यात्री वगैरे अन्य कंपन्यांच्या ॲपच्या माध्यमातून बेळगाव शहरांतर्गत आधुनिक प्रवासी सेवा प्रारंभ करण्याची तयारी सुरू आहे.

मात्र कोणत्याही परिस्थितीत बेळगाव शहरात या प्रवासी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ नये. कारण तसे झाल्यास ऑटो रिक्षा चालकांवर मोठे संकट कोसळणार असून आमचा व्यवसाय इतिहास जमा होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव महापालिकेच्या सहकार्याने शहरात 40 ऑटो रिक्षा स्थानके निर्माण केली जावी.
याखेरीज इलेक्ट्रिक ऑटोरिक्षांना परमिट प्रदान केले जावे अशा आशयाचा तपशील उत्तर कर्नाटक ऑटो रिक्षा चालक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. याप्रसंगी बेळगाव शहरातील ऑटो रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.