बेळगाव लाईव्ह : कालच आपला विवाहवर्धापनदिन साजरा करून घरी परतलेल्या एका शिक्षकाला घरासमोरील गेट उघडणे जीवावर बेतले.
गेटमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना अथणी शहरातील सत्य प्रमोद नगर येथे घडली आहे. प्रवीणकुमार कडापट्टिमठ (वय ४१) असे या दुर्दैवी शिक्षकाचे नाव आहे.
प्रवीणकुमार कडापट्टिमठ हे मूळचे तेरदाळ गावचे रहिवासी होते. अथणी तालुक्यातील सत्ती येथील सरकारी माध्यमिक शाळेत ते कन्नड विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून ते पत्नी आणि दोन मुलांसोबत प्रवासाहून रात्री उशिरा घरी परतले. घराला पोहोचल्यावर, ते घरासमोरील लोखंडी गेट उघडण्यासाठी गेले. नेमके त्याचवेळी गेटमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा त्यांना जोरदार धक्का बसला. विजेच्या तीव्र धक्क्याने ते जागेवरच कोसळले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या हृदयद्रावक घटनेमुळे कडापट्टिमठ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीणकुमार यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. एका तरुण आणि कर्तव्यदक्ष शिक्षकाला अशाप्रकारे अकाली जीव गमवावा लागल्याने अथणी शहर आणि शैक्षणिक वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.


