बेळगाव लाईव्ह :अनगोळ चौथ्या रेल्वे गेट अंडरपास रस्ता बांधताना तो 9 मीटरचा करावा आणि त्याच्या दोन्ही बाजूला किमान 7 मीटर्सचे सर्व्हिस रोड ठेवावेत.
तसेच चौथे गेट ते चिदंबर नगर पर्यंतचा रस्ता तिसऱ्या रेल्वे ब्रिजला जोडावा, अशी मागणी चौथ्या रेल्वे गेट येथील रहिवासी आणि माजी नगरसेवक विनायक गोपाळ गुंजटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अनगोळ चौथ्या रेल्वे गेट येथील रहिवासी, दुकानदार आणि व्यावसायिकांच्यावतीने माजी नगरसेवक गुंजटकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशनी यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. भारत सरकार व भारतीय रेल्वे खात्याकडून जनतेच्या सोयीसाठी अनघोळ चौथ्या रेल्वे गेट येथे अंडर पासची निर्मिती केली जाणार आहे. या कामासाठी 10 मे 2025 पासून काम संपेपर्यंत सदर रेल्वे गेट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
माझी विनंती आहे की सदर अंडरपास बांधताना तो 9 मीटरचा बांधावा आणि त्याच्या दोन्ही बाजूला किमान 7 मीटर्सचे सर्व्हिस रोड ठेवावेत. तसेच जनतेच्या फायद्यासाठी चौथे गेट ते चिदंबरनगर पर्यंतचा रेल्वे मार्ग शेजारून जाणारा रस्ता तिसऱ्या रेल्वे ब्रिजला जोडावा.
सदर रेल्वे गेट परिसरात अनेक दुकाने आणि नागरी वसाहत असल्यामुळे माझी विनंती आहे की अंडरपास बांधकामासाठी गेट बंद करण्यापूर्वी आपण सर्व्हिस रोडसाठी आवश्यक व्यवस्था करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदनावर माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्यासह रशीद तहसीलदार, इकबाल मुजावर, सुनील मुलीमनी, डॉ. सोहा मुल्ला, सुनिता गोवेकर, योगेश हलगेकर, व्यंकटेश कावळे, सादिया शेख, असलम जफर, शोएब मकानदार, संपत हिरेमठ, कीर्ती पुजारी रमेश सुतार, जे. बी. येळ्ळूरकर वगैरे बऱ्याच लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.