बेळगाव लाईव्ह:तांत्रिक कारणांचा आधार घेत कागदपत्रांमध्ये फेरफार करत तब्बल 13 एकर 8 गुंठे शेतजमीन तिघा भावांनी स्वतःच्या नावावर करून घेतली. परंतु, सलग दोन वर्षे न्यायालयीन लढा देत जक्करहट्टी (ता. अथणी) येथील बजबळे कुटुंबियाने आपली शेतजमीन परत मिळवली. जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात आपल्याला न्याय मिळाल्याची भावना शेतीमालक विष्णु बजबळे यांनी व्यक्त केली. दैनिक पुढारीने याबाबतचे सविस्तर वृत्त 15 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, फसवणूक करणारे तिघे भाऊ दौलत नरसिंगराव घोरपडे, खंडेराव नरसिंगराव घोरपडे व आनंद नरसिंगराव घोरपडे (तिघेही रा. मदभावी, ता. अथणी) यांच्याविरोधात अथणी पोलीस ठाण्यात डिसेंबरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, पोलिसांकडून याचा सखोल तपास होत नसल्याचा आरोप बजबळे कुटुंबियांनी केला आहे.
अथणी तालुक्यातील जक्करहट्टी येथील शेतकरी मारुती लिंबाजी बजबळे, आप्पासाहेब लिंबाजी बजबळे व बाबू लिंबाजी बजबळे या तिघा सख्ख्या भावांच्या नावे सर्व्हे क्रमांक 623/3 मध्ये 23 एकर 16 गुंठे शेतजमीन आहे. गेली 70 वर्षे ते ही शेतजमीन कसत असून त्यांच्या कब्जात आहे. प्रत्येक भावाच्या नावे यातील 7 एकर 32 गुंठे शेतजमीन वाटणीला येते.
परंतु, फसवणूक करणार्या तिघा भावांपैकी मास्टरमाईंड दौलत घोरपडे याने अथणी तहसीलदार कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचार्यांना हातशी धरले. फसवण्याच्या उद्देशाने तांत्रिक मुद्याचा आधार घेत दौलत घोरपडेने प्रत्येकी 4 एकर 16 गुंठे यानुसार 13 एकर 8 गुंठे शेतजमीन स्वतःच्या व आपल्या दोघा भावांच्या नावे करून घेतली.

त्यामुळे बजबळे कुटुंबातील प्रत्येक भावाच्या नावे गेल्या सात दशकांपासून 7 एकर 32 गुंठे असलेली शेतजमीन अवघी 3 एकर 16 गुंठे इतकीच शिल्लक राहिली.
*वर्षभर धडपड, डीसींकडून न्याय
बजबळे कुटुंबियातील प्रत्येक भावाने जेव्हा त्यांच्या शेतीचा सातबारा उतारा काढला तेव्हा त्यांना आपल्या नावे अवघी 3 एकर 16 गुंठे जमीन पाहून धक्काच बसला. यासंबंधी न्याय मागण्यासाठी हे सर्वजण जेव्हा तत्कालीन तहसीलदार वाणी यु. यांच्याकडे गेले.
आमच्यापैकी काही जणांच्या कुठेही सह्या नसताना तुम्ही आमची शेतजमीन घोरपडेंच्या नावावर केलीच कशी? असा जाब विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सर्व यंत्रणेलाच आपल्या खिशात घातल्याने बजबळे कुटुंबियांना अथणी तहसीलदारांसह तेथील एकाही अधिकारी व कर्मचार्याने न्याय दिला नाही.
*प्रांताधिकार्यांकडून न्याय पण…
तहसीलदारांच्या वरचा अधिकारी म्हणून बजबळे कुटुंबियांनी चिकोडी प्रांताधिकारी कार्यालय गाठले. अथणी तहसीलदार कार्यालयात घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती तत्कालीन प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांना दिली. आधी त्यांनी देखील टाळाटाळ केली. परंतु, हे प्रकरण बजबळे कुटुंबियांनी तत्कालीन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे नेले. याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक पुढारीने 15 डिसेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत नितेश पाटील यांनी प्रांताधिकारी संपगावी यांना चांगलेच फैलावर घेत याच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. संपगावी हे स्वतः अथणी तहसीलदार कार्यालयात गेले. तेथे त्यांनी 70 वर्षांपासूनची सर्व कागदपत्रे तपासून पाहिली व बजबळे कुटुंबियांवर अन्याय झाला असून त्यांची आधी होती तशी शेतजमीन परत करण्याचा आदेश 21 जून 2024 रोजी बजावला. परंतु, हा आदेश बजावल्यानंतर चिकोडी प्रांताधिकारी कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांनी बजबळे यांना आदेशाची प्रत मिळण्यापूर्वीच ती दौलत घोरपडेला दिली. त्या आदेशाची प्रत घेऊन दौलत घोरपडेने जिल्हाधिकारी कार्यालयात मनाई दावा दाखल केला.
*जिल्हाधिकार्यांकडून न्याय
नितेश पाटील जिल्हाधिकारी असताना हा दावा दाखल झाला. परंतु, यानंतर महिनाभरातच त्यांची बदली होऊन त्यांच्या जागी जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी सुत्रे स्विकारली. त्यानंतर बजबळे कुटुंबियांतील या गरीब शेतकर्यांच्या पुन्हा बेळगावला वार्या सुरू झाल्या. जिल्हाधिकार्यांनी त्यांच्या कायदे सल्लागाराकडून सविस्तर माहिती घेऊन व याबाबतचा स्वतः सखोल अभ्यास करून चिकोडी प्रांताधिकार्यांनी बजावलेला आदेश योग्य असून त्यानुसार ही शेतजमीन बजबळे कुटुंबियांची आहे, असा आदेश काही दिवसांपूर्वी दिला. त्यांचा पूर्वीचा जसा 7 एकर 32 गुंठ्यांचा सातबारा उतारा होता तो कायम ठेवावा, असेही आदेशात नमूद केले. त्यामुळे तब्बल दोन वर्षांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणार्या बजबळे कुटुंबियांना जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी न्याय द
फसवणुकीचा गुन्हा, तपास नाहीच
स्वतःचे शेत पुन्हा मिळवेपर्यंत दमछाक झालेल्या बजबळे कुटुंबियांतील सुशिक्षित विष्णु बजबळे यांनी याबाबतची फिर्याद अथणी पोलीस ठाण्यात तसेच लोकायुक्त कार्यालयाकडेही दिली होती. 11 डिसेंबर 2024 अथणी पोलिसांत (क्राईम नं. 0434/2024) दौलत घोरपडेसह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. परंतु, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. भ्रष्ट अधिकार्यांविरोधात लोकायुक्त पोलिसांकडेही तक्रार करून सहा महिने उलटले तरी याबाबत लोकायुक्त खात्यानेही काहीच पावले उचलली नसल्याचा आरोप शेती मालक विष्णु बाबू बजबळे यांनी केला आहे.
फसवणार्यांचेच दिवस
अथणी, कागवाड, रायबागसह या परिसरातील बहुतांशी शेतकरी व त्यांची मुले कामानिमित्त सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईला स्थायिक झाले आहेत. परंतु, त्यांची शेतजमीन व जुुने घर गावाकडे आहे. ज्यांच्या मागेपुढे कोणी नाही, ज्याची शेतजमीन हडपली तर तो ती परत मिळवण्यासाठी धडपडणार नाही, अशा लोकांना हेरून त्यांच्या शेतजमिनीत काही तरी तांत्रिक कारण काढून ती परस्पर हडपणारे भू-माफिया या भागात वाढलेले आहेत. अनेकजण आपला कामधंदा सोडून तहसीलदार कार्यालयापर्यंत जात नाहीत मग ते जिल्ह्याच्या ठिकाणी बेळगावला कसे पोहोचणार व त्यांचा वशिला तरी कुठे लागणार? याचाच फायदा उठवत हे भू-माफिया अधिकार्यांना हाताशी धरून फसवत आहेत. या बजबळे कुटुंबियातील ज्यांच्या नावे शेती आहे ते दोघेजण 70 वर्षाचे आहेत, त्यांची मुलेही जगायला बाहेर असतात. यापैकी विष्णु बजबळे हे सुशिक्षित असल्याने त्यांनी लढा दिला व त्यामध्ये त्यांना यश आले. इतरांनीही त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
आमच्याच शेतजमिनीसाठी आम्हाला तब्बल दोन वर्षे फिरावे लागले. अथणी तहसीलदारांसह तेथील प्रत्येक सरकारी कार्यालयात शेकडो हेलपाटे मारले. परंतु, निर्ढावलेल्या यंत्रणेने आम्हाला न्याय दिला नाही. अखेर जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात आपल्याला न्याय मिळाला, याचे समाधान आहे.
विष्णु बजबळे, शेतीमालक