बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात आज दुपारनंतर वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊन अवैज्ञानिक गटार व रस्ते बांधकामाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले. गांधीनगर ब्रिज खालील रस्त्यावर तर पाण्याचा मोठा तलावच निर्माण झाला होता.
बेळगाव शहरात आज दुपारनंतर वळीव पावसाने धुवांधार हजेरी लावल्यामुळे गांधीनगर ब्रिज खालील अंडरपास रस्ता संपूर्णपणे पाण्याखाली बुडाला होता. रस्त्यावर पायाच्या पोटरीपर्यंत पाणी साचलेले असल्यामुळे त्यातून वाहने हाकताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
तसेच कांही वाहन चालकांवर साचलेल्या पाण्यामुळे बंद पडलेल्या आपल्या दुचाकी पाण्यातून ढकलत नेण्याची वेळ आली होती. पादचाऱ्यांना आपले कपडे सांभाळत एकमेकांचा आधार घेत अंदाजाने पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत होते. त्याचप्रमाणे बरेच जण पाणी केंव्हा ओसरणार याची वाट पहात रस्त्याकडेला थांबून होते.

एकंदर ब्रिज खालील रस्ता पाण्याखाली बुडाल्यामुळे जुन्या गांधीनगर ते नवी गांधीनगर दरम्यानची रहदारी प्रभावित झाली होती.
रस्त्या शेजारील अस्वच्छ आणि अवैज्ञानिक गटारीं मधून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे उपरोक्त प्रकार घडला असल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच दरवेळी पावसाळ्यात रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येला जबाबदार कोण? असा संतप्त सवालही केला जात आहे.
केवळ बेळगाव शहरात नव्हे तर बेळगाव शहराच्या पूर्व भागालाही मंगळवारी सायंकाळी पावसाने झोडपले. बसवन कुडची गावात वळीव पावसाने पाणीच पाणी साचल्याचे दृश्य सायंकाळी निर्माण झाले होते बसवांना देवस्थानात देखील पाणी शिरले होते जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर डोगलभर पाणी साचले होते त्यामुळे वाहन चालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती.