येळ्ळूर गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार

0
12
 belgaum

बेळगाव लाईव्ह :“येळ्ळूर हे इतिहास घडवणारं गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य केलं, सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, त्या परंपरेत ही शाळा प्रेरणादायी ठरते.” अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या येळ्ळूर गावातील सरकारी मराठी मॉडेल शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला आज सैनिक भवन प्रांगणात भव्य प्रारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर शरद पवार यांनी या शाळेने पूर्ण केलेल्या १५० वर्षांच्या परंपरेचे कौतुक केले.

१५० वर्षांचा सुवर्ण इतिहास साजरा करताना शाळेच्या जुना-नव्या विद्यार्थ्यांपासून ते ग्रामस्थांपर्यंत सर्वांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. शिवस्मारक ते सैनिक भवन मार्गावर विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून प्रबोधन फेरीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर लक्ष्मी हेब्बाळकर (महिला व बालकल्याण मंत्री, कर्नाटक), चन्नराज हट्टीहोळी (विधान परिषद सदस्य), विठ्ठल हलगेकर (आमदार, खानापूर), डॉ. प्रभाकर कोरे (माजी राज्यसभा सदस्य), प्रकाश मरगाळे (चेअरमन, तुकाराम बँक), समिती नेते रमाकांत कोंडुसकर, समिती नेते आर एम चौगुले,अरविंद चंद्रकांत पाटील (माजी आमदार, खानापूर), दत्ताबाळ काकतकर (प्रोप्रा. कामधेनू व ब्रह्मा कंस्ट्रक्शन, येळ्ळूर), डॉ. माणिकराव साळुंखे (माजी कुलगुरु – शिवाजी विद्यापीठ, भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस इ.), कार्यक्रमाध्यक्ष रावजी पाटील, स्वागताध्यक्ष
एन. डी. गोरे ,गौरवाध्यक्ष सतीश पाटील , मुख्याध्यापक राजेंद्रकुमार चलवादी, शाळा सुधारणा समिती अध्यक्षा रूपा धामणेकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच येळ्ळूर गावात शिक्षणावर भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागात सलग १५० वर्षे शिक्षण सेवा देणे ही सामान्य बाब नाही.येळ्ळूरच्या शाळेत शिकलेली मुले आज देश-विदेशात यश मिळवत आहेत आणि गावाचा, शाळेचा गौरव वाढवत आहेत. याचे श्रेय येथील शिक्षकांच्या अथक परिश्रमांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांनी कधीच ‘भोसले घराण्याचे राज्य’ केले नाही. त्यांच्या आदर्शांप्रमाणे सर्वांना शिक्षण मिळावे हीच खरी प्रेरणा आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मशाल पेटवली. त्याच संघर्षामुळे आज ग्रामीण भागात महिला शिक्षक शिक्षण सेवा देऊ शकतात, असे विचार शरद पवार यांनी मांडले.

 belgaum

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, गावडोजी गुरुजी व गुरुवर्य शामराव देसाई यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी शाळेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार चलवादी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद, शाळा सुधारणा समिती व माजी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आयोजन केले होते.

२७ एप्रिल रोजी “मराठी अभिजात भाषेची समृद्ध परंपरा” या विषयावर व्याख्यान, तसेच “स्मृतींना उजाळा” या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमास शाळेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.