बेळगाव लाईव्ह : विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या निलंबनानंतर आम. रमेश जारकीहोळी यांनी बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांना माहिती देताना आश्चर्यकारक वक्तव्य केले असून यत्नाळांची घरवापसी निश्चित असल्याचे सांगितले. आमदार जारकीहोळी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे यत्नाळांच्या निलंबनामागे नेमके कोणते राजकारण शिजत आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
आम. जारकीहोळी पुढे म्हणाले, आमदार यत्नाळ यांच्यासह आमचा गट भाजपमध्येच राहील. नवीन पक्षाबाबत केलेल्या यत्नाळांच्या विधानामागे वेगळा हेतू होता. माध्यमांमध्ये पसरलेल्या नवीन पक्षाबद्दलच्या बातम्या फक्त अफवा असून यत्नाळ भाजपातच आपल्या कामात तत्पर राहणार आहेत, असे संकेतही आम. जारकीहोळी यांनी दिले.
आम. रमेश जारकीहोळी यांच्या या वक्तव्यांनंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी असल्याच्या चर्चा अधिक गडद झाल्या असून माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्या विरोधात भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचेही निदर्शनात येत आहे. आम. जारकीहोळी यांनी माध्यमांसमोर ‘आमचा गट’ असा उल्लेख केल्याने या व्यतिरिक्त आणखी कोणता गट भाजपमध्ये सक्रिय आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
आमदार रमेश जारकीहोळी पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भाजप आणि आर.एस.एस. कटीबद्ध आहेत यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून देशासाठी वेगळ्या पक्षाची आवश्यकता नाही. यत्नाळ यांनी वेगळा पक्ष स्थापन करण्याचा विचार व्यक्त केला असला तरी त्यांचा उद्देश वेगळा आहे.
आमच्या गटाने भाजपातून कधीही बाहेर पडण्याचा विचार केलेला नाही. यत्नाळ भाजपाच्या विरोधात काहीही बोलत असले तरी आम्ही भाजपातच राहणार आहोत. यामुळे पक्षश्रेष्ठींनी यत्नाळांनी केलेल्या वक्तव्यांचे पुनरावलोकन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.