बेळगाव लाईव्ह : बैलहोंगलमधील एका कार्यक्रमात आमदार बसनगौडा यत्नाळ यांनी भाजप नेतृत्वावर, विजयेंद्र व येडियुरप्पा यांच्या कुटुंबराजकारणावर, तसेच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व काँग्रेस सरकारवर कठोर शब्दांत टीका केली.
“कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी झंडूबाम आणू का?” अशा उपरोधिक प्रश्नाने त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
कर्नाटकमधील भाजप संपत चालला आहे आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे कुटुंबराजकारण, असं सांगताना आमदार बसनगौडा यत्नाळ यांनी थेट येडियुरप्पा आणि राज्याध्यक्ष विजयेंद्र यांच्यावर निशाणा साधला.
जोपर्यंत बापलेकाचं अडजस्टमेंट राजकारण संपत नाही, तोपर्यंत मी भाजपमध्ये परत येणार नाही,असं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, कुडलसंगम स्वामीजींनी काही वक्तव्य केलं आणि त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांना मनस्ताप झाला असेल, तर मी काय झंडूबाम आणून द्यायचं का? असा टोला लगावत त्यांनी भाजप आणि काँग्रेस, दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. हेब्बाळकर यांनी पंचमसाली समाजाच्या बाजूने उभं राहत असल्याचं दाखवलं, पण प्रत्यक्षात समाजाला २ए आरक्षण न देता फसवणूकच केली, असा आरोप त्यांनी केला.
हिंदूंनी आरक्षण मागितलं, तर ते संविधानविरोधी ठरतं, पण मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण सहज दिलं जातं. जैन, शीख हे अल्पसंख्याक नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित करत धर्माच्या आधारे चालणाऱ्या आरक्षणावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यत्नाळ यांनी आरोप केला की, विजयेंद्र भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात, पण ते स्वतःच वडिलांच्या बनावट सह्या करून कागदपत्रं तयार करतात. हेच विजयेंद्रचे चमचे माझ्या जमीर अहमद यांच्याशी झालेल्या चहाच्या बैठकीचे फोटो चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर पसरवतात. बेळगाव ही माझ्या राजकीय संघर्षाची पुण्यभूमी आहे. भाजपने मला पक्षातून काढलं असलं, तरी लवकरच जनतेचं उच्छाटन त्यांच्यावर होईल, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेतृत्वावर रोष व्यक्त केला.
काही नेते पंचमसाली मठाच्या नावाने दिल्लीपर्यंत राजकीय खेळी करत असून, मी मंत्री होण्याच्या स्पर्धेत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंचमसाली मठातून कोणाला बाजूला करायचं असेल, तर करा, पण मी संपूर्ण हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मला नको त्या विषयांवर प्रश्न विचारू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, जो स्वतःला शेतकरी नेता म्हणवतो, तो परदेशात संपत्ती गोळा करत आहे. मी आजवर दिलेल्या कोणत्याही आव्हानाला कोणी उत्तर दिलं का? असा सवाल करत त्यांनी विजयेंद्र यांना पुन्हा लक्ष्य केलं. भाजपचा विनाश आता कुटुंबराजकारणामुळे ठरलेला आहे. कर्नाटकला नव्या पक्षाची गरज आहे, आणि जनता तनमनधनाने तयार आहे, असा इशारा देत आपल्या नव्या पक्षस्थापनेबाबतचा इशाराही त्यांनी आपल्या बोलण्यातून दिला.