belgaum

स्त्रीशक्तीच्या शिवप्रेमातून उजळलेला चित्ररथजननी महिला मंडळाचा अनुकरणीय उपक्रम

0
35
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. गेल्या १०६ वर्षांपासून शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य चित्ररथ मिरवणुकीचे आयोजन होत असून, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत तब्बल १२ तासांहून अधिक काळ ही मिरवणूक सुरू असते. सजीव देखावे, मर्दानी खेळ, ढोल-ताशा, वाद्यपथके आणि कलापथकांच्या सादरीकरणातून शिवकालीन परंपरेचे दर्शन घडते. अलीकडच्या काळात या मिरवणुकीत महिलांचा सहभागही लक्षणीय प्रमाणात वाढत चालला आहे.

या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मिरवणुकीत ताशिलदार गल्लीतील जननी महिला मंडळ गेली सात वर्षे आपला सशक्त आणि वेगळा ठसा उमटवत आहे.

एकेकाळी इतर चित्ररथ मिरवणुकीत सहकार्य करणाऱ्या या मंडळाने डीजेच्या वाढत्या गोंगाटामुळे मूळ उद्देश हरवतो आहे, हे ओळखून स्वतंत्र चित्ररथ साकारण्याचा निर्णय घेतला. त्यातून आज एक प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे.

 belgaum

शिवजयंतीचा खरा अर्थ आणि शिवकालीन इतिहास जपण्यासाठी जननी महिला मंडळ सजीव देखाव्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवे सादरीकरण घडवते. त्यांच्या चित्ररथावरून ऐतिहासिक घटनांचे सजीव दर्शन घडवले जाते. केवळ बेळगाव नव्हे तर परगावांतूनही अनेक शिवभक्त हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून येतात.


जननी महिला मंडळाच्या स्वाती गणेश चौगुले या गेली 6 वर्षे ताशीलदार गल्लीच्या चित्रथावर छत्रपती शिवाजी महाराजांची व्यतिरेखा साकारत आहेत.

या चित्ररथाची खासियत म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. गेल्या दोन वर्षांत संपूर्ण सजीव देखावा महिलांच्याच सहभागातून उभा राहतो आहे. महिलांनी पुरुष पात्रांच्याही भूमिका समर्थपणे साकारत शिवकालीन परंपरेचा जागर घडवला आहे. यामुळे डीजेकडे वळलेले अनेक तरुण पुन्हा पारंपरिक सजीव चित्ररथाकडे आकर्षित झाले आहेत.

यंदा जननी महिला मंडळ नेताजी पालकर आणि संभाजी महाराजांच्या जन्मसोहळ्यावर आधारित १९ मिनिटांचा देखावा सादर करणार आहे. स्वाती गणेश चौगुले या शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार असून रेश्मा भादरे, वैशाली चौगुले, भारती जुवेकर, मेघा जाधव, गीता जुवेकर, गायत्री पाटील, सुनीता भादरे, लक्ष्मी मस्तिहोळीमठ, अनिता गेंजी या महिला कलाकारांचा सहभाग आहे. दहा महिला आणि दहा पुरुष अशा एकूण २० कलाकारांचा सहभाग या देखाव्यात असणार आहे.

विशेष म्हणजे महिलांनी आपली घरकामे, नोकरी आणि ऑफिसची जबाबदारी सांभाळत दररोज रात्री ९ वाजता तालमीसाठी वेळ देणे हे या उपक्रमाचे मोठे वैशिष्ट्य आहे. अवघ्या आठ दिवसांत हा देखावा उभा केला जातो.

या स्तुत्य उपक्रमाला श्री शिवजयंती उत्सव मंडळ, ताशिलदार गल्ली यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. गणेश चौगुले, गजानन पाटील, गजानन जुवेकर आणि शिरीष चौगुले यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

बेळगावची शिवजयंती मिरवणूक हे केवळ एक उत्सव नाही, तर इतिहासाशी जोडणारा सांस्कृतिक पूल आहे. जननी महिला मंडळाचा चित्ररथ या पुलाचा तेजस्वी भाग ठरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.