बेळगाव लाईव्ह:नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाच्या बेळगाव रेल्वे स्थानकात प्रवेश करताना गुड्स अर्थात मालवाहू रेल्वे गाडीच्या दोन वाघीणी (डबे) रुळावरून घसरल्याची घटना आज मंगळवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे ओव्हर ब्रिज नजीक मिलिटरी महादेव मंदिरासमोर घडली. यामुळे बेळगाव मार्गे होणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.
बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ मालवाहू रेल्वे रूळ बदलत असताना तिचे दोन डबे आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास रुळावरून घसरले. याबाबतची माहिती मिळताच नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत रुळावरून घसरलेले दोन्ही डबे मार्गावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले.
प्रयत्नांती एक डबा रुळावर आणण्यात आला तर दुसरा रुळाशेजारी उतरवण्यात आला. त्यामुळे बेळगाव मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. दरम्यान, बेळगाव रेल्वे स्थानकाजवळ जेएसडब्ल्यूटी अर्थात गुड्स रेल्वेचे 2 डबे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे क्र. 56932 लोंढा-मिरज पॅसेंजर देसूर येथे, रेल्वे क्र. 17301 म्हैसूर-बेळगाव एक्सप्रेस खानापूर येथे,
रेल्वे क्र. 16589 बेंगलोर-सांगली एक्सप्रेस लोंढा येथे, रेल्वे क्र. 16508 बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस देवराई येथे, रेल्वे क्र. 17415 तिरुपती – कोल्हापूर हुबळी येथे प्रभावित झाली होती. त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 16531 अजमेर – बेंगलोर एक्स्प्रेस रायबाग येथे, रेल्वे क्र. 17331 मिरज – हुबळी कुडची येथे, रेल्वे क्र. 11005 दादर सेंट्रल – पुडुचेरी एक्सप्रेस घटप्रभा येथे, रेल्वे क्र. 17318 दादर – हुबळी एक्सप्रेस सुळेभावी येथे प्रभावीत झाली होती. मात्र परिस्थिती नियंत्रणाखाली आल्यानंतर नैऋत्य रेल्वे हुबळीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कानमाडी यांनी पूर्वी नियंत्रित केलेल्या सर्व गाड्या आता त्यांच्या संबंधित मार्गांवर धावत आहेत.
कारण बेळगाव स्थानकावरील रोड 1 आणि रोड 2 चा प्रभावित भाग सकाळी 10 वाजता मोकळा करण्यात आला आहे. कोणत्याही गाड्या वळवण्यात आलेल्या नाहीत किंवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.