बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाइपलाइनच्या कामादरम्यान भीषण दुर्घटना घडली असून गांधी नगरजवळ राष्ट्रीय महामार्गालगत मातीचा ढिगारा कोसळून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार (१६ एप्रिल) रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने बेळगावात ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचं काम सुरू आहे.
याच कामासाठी मूडलगी तालुक्यातील पाटगोंडी गावचे शिवलिंग मारुती सरवे (वय २०) आणि बसवराज सरवे (वय ३८) हे दोघे मजूर म्हणून आले होते. बुधवारी दुपारी काम सुरू असताना अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळला आणि दोघे त्यात गाडले गेले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू केले. मात्र, एक तासाहून अधिक प्रयत्न करूनही दोघांचे मृतदेह बाहेर काढले गेले. त्यानंतर मृतदेह बिम्स रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन्ही मजुरांना मृत घोषित केलं.
या घटनेमुळे घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी हटवली. मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात पोहोचताच आक्रोश केला.