बेळगाव लाईव्ह : अतिवाड फाट्यावर एका बंद घरावर चोरट्यांनी धाडसी हात साफ केला आहे. लावणी सम्राट बालाजी चिकले यांच्या बेळगावातील घरात चोरी होऊन दहा तोळे चांदीचे दागिने, रोकड आणि कृषीपंप असा मोठा ऐवज चोरीला गेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असला तरी तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे.
बेळगाव-कोवाड मुख्य मार्गावरील अतिवाड फाट्यावर बुधवारी (दि. ९ एप्रिल) रात्री अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घर फोडले. हे घर मुंबईस्थित लावणी सम्राट बालाजी चिकले यांचे असून, सध्या बंद अवस्थेत आहे.
चोरट्यांनी दोन्ही दरवाज्यांची कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम, दहा तोळे चांदीचे दागिने, तसेच घराशेजारी ठेवलेला ३० हजार रुपयांचा कृषीपंप लंपास केला. घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस स्थानकातील कर्मचारी गुरुवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. मात्र या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कलाकार हा समाजासाठी आपली कला समर्पित करणारा व्यक्ती असतो. आधीच आर्थिक व सामाजिक अडचणींशी झुंजणाऱ्या कलाकारावर असा प्रसंग ओढवणे हे दुर्दैवी आहे. बालाजी चिकले हे लोकप्रिय लावणी कलाकार असून, त्यांच्या घरावर चोरी झाल्यामुळे त्यांच्यावर मानसिक व आर्थिक ताण आला आहे.
बेळगाव शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांत चोऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मंदिर, घरे, दुकाने, आस्थापने, कोणताही ठिकाण असो, चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढते आहे. पोलिसांचे लक्ष अधिक केंद्रित न झाल्यास सामान्य नागरिकांचा सुरक्षिततेवरील विश्वास ढासळण्याची शक्यता आहे.
या प्रकारांवर तात्काळ आळा घालण्यासाठी गस्त व्यवस्था वाढवणे, संशयितांची चौकशी करणे गरजेचे आहे. या प्रकारांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर व तालुक्यात वाढत चाललेल्या घरफोड्या, मंदिरांत व आस्थापनांतील चोऱ्या या पोलिसांच्या गस्त व तपास यंत्रणांवर मोठा सवाल उपस्थित करत आहेत.
फक्त घटनास्थळी जाऊन पंचनामा करणे ही कायद्याची प्रक्रिया असली, तरी त्यापलीकडे पोलीस प्रशासनाने प्रभावी कारवाई करून चोरट्यांना गजाआड करणे अपेक्षित आहे.