बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील संतीबस्तवाड परिसरातील सहकारी संस्थेत झालेल्या धाडसी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे.
साक्षीदारांच्या जबाबांतील विसंगती आणि सबळ पुराव्यांचा अभाव यामुळे ही मुक्तता झाली. नावगे क्रॉस, शिवाजीनगर, संतीबस्तवाड ता. जि. बेळगाव येथील श्री ज्ञानेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, किणये शाखेमध्ये दिनांक २२ एप्रिल २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाली होती. या प्रकरणात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी सिताराम सुभाष पाटील, व्यवसायाने सोसायटी मॅनेजर, यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रात्रीच्या वेळेस संस्थेच्या शटरचे लॉक लोखंडी रॉडने उचकटून आत प्रवेश करत, ड्रॉवरमधून १७,२०० रुपयांची रोख रक्कम चोरली गेली होती. या घटनेनंतर भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशातील अंबेडकर नगर जिल्ह्यातील फैजाबाद तालुक्यातील भोजवा येथील रहिवासी, सध्या लक्ष्मीनगर, मच्छे येथे वास्तव्यास असलेला महम्मदशा अलम आयुभहुसेन खान (वय २४ वर्षे) याला २ ऑगस्ट २०१७ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याबरोबर आणखी दोन आरोपींचा सहभाग उघड झाला होता, परंतु ते अद्याप फरार आहेत.
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. मात्र दुसरे जेएमएफसी न्यायालय, बेळगाव येथे चाललेल्या सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती आढळली, तसेच घटनेशी संबंधित सबळ पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपी महम्मदशा खान याला निर्दोष मुक्त केलं. या खटल्यात आरोपीच्या वतीने अधिवक्ता अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी युक्तिवाद केला.