बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या पहिल्या उड्डाणपुलाच्या प्रतिक्षेत मोठी हालचाल झाली असून, अधिकृत सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या उड्डाणपुलाकडे पाहिले जात आहे. मंगळवारी, २२ एप्रिल रोजी सम्राट अशोक चौक ते धर्मवीर संभाजी चौक या मार्गावर महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व प्रांतीय आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात दोन्ही बाजूच्या जमिनींचा वापर व मालकी हक्काची माहिती संकलित करण्यात आली.
या प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४.५ किलोमीटर असून, हा पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जवळील संकम हॉटेलपासून सुरू होऊन कित्तूर राणी चन्नम्मा चौक, डॉ. आंबेडकर रोडमार्गे केएलई रुग्णालयापर्यंत जाणार आहे.
महसूल विभागाला मार्गावरील उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे जमिनी संपादनासंबंधी स्पष्टता मिळून डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) तयार करण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पासाठी पुढाकार घेतलेले जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाल्यानंतर दोन वर्षांत पूल पूर्ण करण्यात येईल. यापूर्वी १९ एप्रिल रोजी डीसी कार्यालयात संपादन व डिझाइनबाबत बैठक होणार होती, मात्र ती इतर कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली. तरीही सर्वेक्षण सुरू झाल्याने कामाला वेग आलेला आहे.

सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पाचा विचार मांडला होता. केंद्राकडून निधी मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतही चर्चा झाली, पण निधी न मिळाल्यामुळे राज्य सरकारच्या निधीतूनच प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आता डीपीआर तयार होऊन टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. सर्व काही वेळेत पार पडल्यास २०२६ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू होऊन २०२८ मध्ये उड्डाणपूल वापरात येईल अशी शक्यता आहे.
हा उड्डाणपूल केवळ वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नाही, तर बेळगावच्या शहराच्या विकासासाठी एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे असे मत जिल्हा पालकमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.