बेळगाव लाईव्ह :स्टार एअरलाईन्स एप्रिल-मे पासून बेळगावहून आपले कामकाज वाढवणार असून प्रादेशिक संपर्क (कनेक्टिव्हिटी) वाढवण्यासाठी नवीन मार्ग आणि अद्ययावत सुधारित सेवा सुरू करणार असल्याचे वृत्त सीएनबीसी टीव्ही 18 डॉट कॉमने वृत्त दिले आहे.
स्टार एअरलाइन निवडक मार्गांवर प्रगत एम्ब्रेर ई175 विमान तैनात करणार असून ज्यामध्ये आराम आणि प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी बिझनेस-क्लास केबिन असणार आहे. मे मध्ये, हे विमान बेळगावी-मुंबई-कोल्हापूर आणि परतीच्या सेवेसाठी उपलब्ध केले जाईल. यामुळे क्षमता आणि प्रवाशांच्या सोयी दोन्ही वाढणार आहेत.
विस्ताराचा एक भाग म्हणून, अनेक नवीन मार्ग आणि पुनश्च सुरू केलेल्या सेवा देखील कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. बेळगाव -जयपूर -बेळगाव : प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत (आरसीएस) सेवा सुरू राहणार असल्यामुळे परवडणारे प्रवास पर्याय उपलब्ध होतील.
बेंगलोर -बेळगाव -बेंगलोर : एप्रिलच्या मध्यापासून उड्डाणे पुन्हा सुरू होणार असल्यामुळे एक महत्त्वपूर्ण संपर्क पुन्हा स्थापित होईल. बेळगाव -पुणे -बेळगाव : एप्रिलच्या मध्यापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. बेळगाव -हैदराबाद -बेळगाव : नवीन सेवा मेच्या मध्यात सुरू होत आहेत.
या विकासाबाबत बोलताना स्टार एअरच्या मुख्य व्यावसायिक आणि विपणन अधिकारी शिल्पा भाटिया म्हणाल्या, स्टार एअरमध्ये आमचे ध्येय नेहमीच प्रादेशिक संपर्कामधील अंतर भरून काढणे आणि प्रवाशांना एक अखंड उड्डाण अनुभव प्रदान करणे हे राहिले आहे.
बिझनेस-क्लास केबिनसह एम्ब्रेर ई175 विमानाची सुरुवात करणे हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे नवीन मार्ग व्यवसाय आणि प्रवाशांसाठी आरामदायी संपर्क वाढवण्याबरोबरच प्रादेशिक विकास आणि आर्थिक संधींना चालना देतील, असा विश्वास भाटिया यांनी व्यक्त केला.
एकंदर प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र म्हणून बेळगावचे स्थान मजबूत करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे.