बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शिवजयंती मिरवणूक ही ऐतिहासिक आहे मात्र गेल्या काही वर्षात डॉल्बी च्या आवाजाने शिवजयंतीचे पारंपरिक महत्व बाजूला जात आहे यासाठी शिवजयंती मिरवणूक ऐतिहासिक व्हावी त्या मिरवणुकीला गत वैभव प्राप्त व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोतेश बारदेशकर यांनी पत्रक तयार करून वाटप करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यांनी बेळगाव शहरातील विविध शिवजयंती उत्सव मंडळ संघ संस्था आणि नागरिकांना हजारोंच्या संख्येने पत्रक वाटली आहेत. नेमकं त्या पत्रकात काय लिहिलंय आपण जाणून घेणार आहोत.
शिवरायांचे स्मरण करायचे असेल तर व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, धर्मरक्षक तत्वे अंगी बाणवावी लागतील. त्यासाठी आमची मर्दुमकी, आमचा इतिहास विसरायला लावून आम्हाला मानसिक दृष्ट्या षंढ बनवणाऱ्या, आमचे मर्दानी मराठीपण गिळंकृत करणाऱ्या डॉल्बी सारख्या विकृत इलेक्ट्रॉनिक वाद्याला श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकी मधून कायमचे हद्दपार करायला हवे, अशा आशयाचे ‘श्री शिवजयंती करण्यास आम्ही लायक आहे का?’ या शीर्षका खालील पत्रकं वाटून समाजात जनजागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम मोतेश बारदेशकर या मराठी युवकाने हाती घेतला असून त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
श्री शिवजयंती करण्यास आम्ही लायक आहे का? या शिक्षकाखालील जनजागृती पत्रकामध्ये प्रारंभी बेळगाव शहरातील श्री शिवजयंती उत्सव आणि चित्ररथ मिरवणुकीची महती नमूद करण्यात आली आहे. पूर्वी श्री शिवजयंती चित्ररथांच्या मिरवणुकीत बैलगाड्यांचा समावेश असायचा. मिरवणुकीच्या अग्रभागी मंगल वाद्ये, करडीमजल, धनगर ढोल, देशभक्तीपर गीते वाजवणारे बँड पथक असायचे. त्यापाठोपाठ मर्दानी खेळ, लेझीम पथक आणि शेवटी चित्ररथ मार्गस्थ होताना दिसायचे.
चित्ररथांमध्ये शिवचरित्रामधील वेधक प्रसंग जिवंतपणे सादर केले जात. रस्तोरस्ती उधाणलेली गर्दी, ऐतिहासिक प्रसंग पाहून आपल्या महाराजांचे आणि मावळ्यांचे कार्यकर्तृत्व डोळे भरून पाहात, अन् पुढच्या पिढींना हा इतिहास समजावून सांगत. असा हा समृद्ध वारसा चिरंतन जपला गेला. शिवजयंतीच्या तीन दिवसात शिवचरित्राची व्याख्याने, पोवाडे वगैरे कार्यक्रम होत. मात्र अलीकडच्या काळात व्यसनांचे ग्रहण लागून मराठी तरुण बघता बघता आपली अस्मिता हरवल्यागत वागू लागले. एकदा अस्मिता सरली की संस्कृती ढेपाळते, संस्कार लोप पावतात आणि त्यामुळे चंगळवादी संस्कृती फोफाऊ लागते. याचाच परिणाम म्हणजे चित्ररथ मिरवणुकीतील मर्दानी खेळ अस्तगत झाले. दिखाऊपणा जोपासला जाऊ लागला, दाढ्या वाढवून कपाळावर टिळे मिरवत दंड प्रदर्शन करणारे तरुण महाराष्ट्र आणि मराठी बाणा विसरले. शिवजयंती गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकींना विकृत वळण लागले. शोभेची दारू आणि नशेची दारू यांचा अंमल वाढू लागला.

नशेला नाचवण्यासाठी ‘डॉल्बी’ सारखे विकृत इलेक्ट्रॉनिक वाद्य रस्त्यावर उतरले. हातातील लाठी, बोधाटी, दांडपट्टा, तलवार, करेला, लेझीम नेस्तनाबूत होऊन आकाशाकडे बोट दाखवत नशेत चूर झालेले तरुण तोंडात गुटख्याचे गोळे कोंबून बेधुंद नाचू लागले. पोटातील आतडी हलवणारे हे संगीत लोकांच्यासाठी अनेक आरोग्यवर्धक समस्या निर्माण करू लागले गर्भाशयातल्या गर्भाला हानी पोहोचवणारे हे संगीत लोकांचे कान निकामी करू लागले. हृदयविकार झालेले लोक हैराण झाले. म्हातारे, आजारी लोक त्याचे शिकार झाले. डॉल्बीच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे जिवंत देखावे निर्जीव झाले. शिवचरित्रातील ज्वलंत कथानके निष्प्रभ ठरू लागली.
मिरवणुकीची वेळ-काळ बदलली. मानाच्या पालखीचा दिमाख झाकोळला. उत्सवात उन्माद आला उत्साह सरला, श्रद्धा हरपली झिंग उरली, इतिहास लोपला व वास्तव काळातील व्यसने तरारली. आमचे मर्दानी मराठी पण डॉल्बीने गिळंकृत केले. छ. शिवरायांची जयंती साजरी करण्याचा आम्हाला अधिकार उरला आहे काय? त्यांच्या शौर्याच्या गाथा विसरून डॉल्बीच्या तालावर ठेका धरून नाचण्याने आपण शिवरायांच्या अलौकिक कार्याचा, त्यांच्या अद्वितीय स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचा, स्वराज्यासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱ्या ज्ञात -अज्ञात मर्द मराठी मावळ्यांचा कोणता गौरव करणारा आहोत?
डॉल्बी ही विकृती आहे, डॉल्बी ही कीड आहे, डॉल्बीमुळे आम्ही आमची मर्दुमकी, आमचा इतिहास विसरून मानसिक दृष्ट्या षंढ बनत चाललो आहोत. हे असेच चालू राहणार असेल तर आपण आपल्या जीवनातून जगण्यातून संस्कृती मधून छ. शिवरायांना आणि त्यांच्या ज्वलंत इतिहासाला मुक्त करायला हवे. शिवरायांचे नाःव घेण्याचा अधिकार आम्हाला राहणार नाही. शिवरायांचे स्मरण करायचे असेल तर व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न, राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी, धर्मरक्षक तत्वे अंगी बाणवावी लागतील आपली ज्वलंत अस्मिता जोपासावी लागेल. आपल्या इतिहासाचे वारंवार स्मरण करून त्यातील तात्विक प्रणाली अंगीकाराव्या लागतील. न पेक्षा आम्ही डॉल्बीच्या तालावर नाचून शिवजयंती करणार असलो तर तो अधिकार आपल्याला नाही. त्यापेक्षा आपण आपल्याच वाडवडिलांचे फोटो व पुतळे ठेवून त्यांच्यासमोर हे हिडीस प्रदर्शन करण्यास मोकळे आहोत. म्हणूनच म्हणावेसे वाटते डॉल्बीमुक्त शिवजयंती करावी अन्यथा करू नये, अशा आशयाचा तपशील जनजागृती पत्रकात नमूद आहे.