बेळगाव लाईव्ह : साखर उद्योगाशी संबंधित संस्थांनी संशोधनावर भर दिला पाहिजे, पण त्याचवेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट जाऊन मार्ग काढणे अधिक महत्त्वाचे आहे, असं मत साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी व्यक्त केलं.
बेळगावमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या परिषदेत साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी साखर उद्योग, संशोधन आणि शेतकऱ्यांच्या हितावर स्पष्ट भूमिका मांडली. एस. निजलिंगप्पा साखर संस्था येथे दक्षिण भारत साखर संस्था आणि तांत्रिक संघटनेच्या संयुक्त आयोजनात सदर परिषद पार पडली.
शिवानंद पाटील पुढे म्हणाले, मी शेतकऱ्यांच्या समस्या स्वतः समजून घेण्यासाठी थेट त्यांच्या शेतात जाऊन चर्चा करतो. संशोधनावर माझा फारसा विश्वास नसला, तरी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधनाची आवश्यकता नाकारता येत नाही.
सहकारी संस्था शेतकऱ्यांचे हित जपत कारखाने चालवत आहेत. बँका या संस्थांना आवश्यक तेवढं कर्जही देत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकार आपले प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे आंध्रप्रदेशात ज्या अडचणी आहेत, त्या कर्नाटकमध्ये नाहीत, असं त्यांनी नमूद केलं.
तसेच, काही खाजगी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना पैसे न देता फसवणूक करण्यात येत आहे, ही गंभीर बाब असून अशा कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उद्योगावर आधारित भरपूर संशोधन सुरू आहे. ही संशोधनं शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरावी, यासाठी सरकारने दिशादर्शक उपाययोजना कराव्यात, असे मत त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाला साखर आयुक्त एम. आर. रविकुमार, एन. चिन्नप्पन, एस. पी. पाटील, व्ही. एम. कुलकर्णी, आर. व्ही. वाट्नाळ, विक्रमकुमार शिंदे, आनंद मुरुगन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.