बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील भव्य अशी ऐतिहासिक श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक येत्या 1 मे 2025 रोजी काढण्यात येणार असून विशेष म्हणजे ही मिरवणूक डीजे मुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
त्यामुळे संपूर्ण परिसर हादरवून टाकणारा डॉल्बीचा दणदणाट यंदा शहरवासीयांना सहन करावा लागणार नाही. या पद्धतीने बेळगाव शहरात स्तुत्य पाऊल उचलले जात असताना दुसरीकडे शहराचे अनुकरण करून ग्रामीण भागातही ‘डीजे’ मुक्त शिवजयंती मिरवणुकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहरातील श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीला 106 वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. श्री शिवजयंतीच्या तिसऱ्या दिवशी ही पारंपारिक शिवजयंती मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे सादरीकरण केले जाते.
प्रारंभी 100 वर्षांपूर्वी लेझीमच्या ठेक्यात ही मिरवणूक काढली जात होती. पुढे 1975 मध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर बेळगावसह सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला. त्यामुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत अनेक मंडळे सीमाप्रश्नावर भाष्य करणारे देखावे सादर करत होती.
मात्र त्यावर कर्नाटक पोलिसांकडून बंदी घालण्याचा प्रकार 1986 नंतर सुरू झाला आणि त्यामुळे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखाव्याच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा सुरू झाली, जी आजतागायत सुरू आहे. मात्र या जोडीला डीजेचा दणदणातही वाढला आहे. डीजे -डॉल्बीमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन यंदा शहरात डीजे मुक्त चित्ररथ मिरवणुकीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरवर्षी बेळगाव शहरात काढल्या जाणाऱ्या श्री शिवजयंती उत्सव भव्य चित्ररथ मिरवणुकीचे अनुकरण आता ग्रामीण भागातही केले जात आहे. मात्र कांही गावातील मंडळे मिरवणुकीमध्ये डीजेचा दणदणाट करून संपूर्ण गाव हादरवून टाकण्याचे काम करत असतात. बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावातील मंडळे मिरवणुकी जीवंत देखावे सादर करत आहेत. मात्र त्याच्या जोडीला डीजे लावून मिरवणुकीत रात्रभर नाचून धिंगाणा घालण्याचे प्रकार ही वाढले आहेत. हा प्रकार थांबून श्री शिवजयंती चित्रपट जिवंत देखावा यांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.