बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर, परिसर आणि ग्रामीण भागात आज मंगळवारी शिवमय वातावरणात 350 वा शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने अपूर्व उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे. श्री शिवजयंती निमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी ध. संभाजी महाराज चौक येथे विविध गड किल्ल्यांवरून आणण्यात आलेल्या शिवज्योतींचे स्वागत करण्याबरोबरच नरगुंदकर भावे चौक आणि शिवाजी उद्यान येथे शिवरायांच्या जयघोषात छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
श्री शिवजयंती निमित्त आज मंगळवारी सर्वप्रथम ध. संभाजी महाराज चौक येथे मध्यवर्तीय शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे रमाकांत कोंडुसकर, रमेश पावले, रणजीत चव्हाण -पाटील, नगरसेवक रवी साळुंखे ॲड. अमर येळ्ळूरकर वगैरेंनी महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांवरून आलेल्या शिवज्योतींचे पुष्पहार घालून स्वागत केले. येळ्ळूर, बेळगावच्या राजहंस गड किल्ल्यासह महाराष्ट्रातील किल्ले रायगड, कलानिधीगड, किल्ले महिपालगड, किल्ले यशवंत गड, किल्ले लोहगड, किल्ले पारगड, किल्ले सामानगड, किल्ले सिंधुदुर्ग वगैरे गडकिल्ल्यांवरून ध. संभाजी महाराज चौक येथे आज सकाळी लवकर शिवज्योतींचे आगमन होण्यास सुरुवात झाली होती.
या शिवज्योती आणणारी मंडळे आणि शिवभक्तांमध्ये श्री शिवज्योत राजारामनगर उद्यमबाग, श्री छत्रपती शिवाजी युवक मंडळ कल्लेहोळ, महेश अरुण शिंदे गणेशपुर, अनिरुद्ध उंदरे नानावाडी, गणेश सूर्यवंशी सदाशिवनगर, श्री शिवज्योत हिंडलगा रामदेव गल्ली, श्री गणेश युवक मंडळ गणेश पेठ जुने बेळगाव, श्री शिवजयंती उत्सव मंडळ अनंतशयन गल्ली, श्री शिवजयंती उत्सव मंडळ आनंदवाडी, बाल शिवाजी युवक मंडळ मेणसे गल्ली, श्री स्वराज्य युवक मंडळ मजगाव, श्री वायुपुत्र सेना मंडळ नवी गल्ली शहापूर, ओमकार तरुण मित्र मंडळ पवार गल्ली शहापूर, एकता युवक मंडळ हट्टीहोळ गल्ली शहापूर, शिवशक्ती युवक मंडळ शास्त्रीनगर, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कोरे गल्ली, श्री ब्रम्हलिंग युवक मंडळ गंगानगर गणेशपुर, श्री छत्रपती शिवाजी महाराज युवक प्रतिष्ठान लक्ष्मीनगर हिंडलगा, बाल शिवाजी युवक मंडळ लोहार गल्ली अनगोळ आदींचा समावेश होता.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात आज श्री शिवजयंती पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी केली जात असून त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवरून या ठिकाणी शिवज्योतींचे आगमन होत आहे असे सांगितले.

सदर ज्योत आणणारी मंडळे आणि शिवभक्तांचे मी समस्त बेळगावकरांतर्फे स्वागत व अभिनंदन करतो असे सांगून आजच्या युवा पिढीने छ. शिवाजी महाराजांचे विचार जाणून घेऊन त्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम आपल्या युवकांनी निर्व्यसनी झाले पाहिजे, असे मत कोंडुसकर यांनी व्यक्त केले. रमेश पावले बोलताना म्हणाले की, आम्ही आज छ. शिवाजी महाराजांची 350 वी जयंती आणि बेळगाव शहरातील 106 वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. बेळगावची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेली बेळगावची श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी सीमाभागासह महाराष्ट्र गोवा आणि कोकणातील अबालवृद्ध मोठ्या संख्येने बेळगावला येत असतात. बेळगाव सारखी भव्य अशी श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणूक देशात अन्यत्र कुठेही पहावयास मिळत नाही. त्यामुळेच कांही इतिहासकारांनी म्हटले आहे की, भले सर्वाधिक किल्ले महाराष्ट्रात असतील मात्र शिवरायांचे खरे मावळे हे बेळगावसह सीमाभागामध्येच आहेत. श्री शिवजयंती निमित्त आज बेळगाव मध्ये जवळपास 400 ते 500 कि.मी. अंतरावरून शिवज्योत आणण्याचा कार्यक्रम होत आहे, ज्यामध्ये 40 ते 45 युवक मंडळे तसेच युवक -युवतींचा सहभाग आहे अशी माहिती देऊन येत्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा वापर कटाक्षाने टाळावा, असे आवाहन पावले यांनी शहर परिसरातील देखावे सादर करणाऱ्या सर्व श्री शिवजयंती उत्सव मंडळांना केले. याप्रसंगी महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, गणेश दड्डीकर आदिंसह अन्य पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवज्योतींच्या स्वागत कार्यक्रमानंतर मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव महामंडळातर्फे आज सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौक येथील महामंडळाच्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पूजनाचा कार्यक्रम आरती म्हणून विधिवत पार पडला. त्यानंतर शहापूर येथील छ. शिवाजी उद्यानात देखील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून त्याला अभिवादन करण्यात आले. शिवरायांच्या जयजयकारात पार पडलेल्या या कार्यक्रमांप्रसंगी मध्यवर्तीय श्री शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, मदन बामणे, ॲड अमर येळ्ळूरकर, विकास कलघटगी, राजाराम हंगिरगेकर, गणेश दड्डीकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, गणेश दड्डीकर वगैरेंसह बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.