बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील गुरुजन, समस्त नागरिक आणि यात्रा कमिटीतर्फे येत्या मंगळवार दि. 22 ते बुधवार दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे चेअरमन सतीश शहापूरकर यांनी दिली.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सतीश शहापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर नऊ दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार 22 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता बडेकोळ्ळमठ तारीहाळचे प.पू. श्री नागाप्पा महास्वामीजी व शरणमट्टीचे प.पू. श्री रुद्रय्या महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात श्री महालक्ष्मी मंदिराचे उद्घाटन होईल. यावेळी उद्घाटक म्हणून बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर उपस्थित राहणार आहेत.
मंदिर उद्घाटनानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी 4 वाजता श्री देवीला होन्नाट खेळत रथात विराजमान केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी 23 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता रथोत्सवाला सवाद्य प्रारंभ होणार आहे. रथोत्सवाचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालकल्याण, दिव्यांग व जेष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते केला जाईल. यावेळी कारंजीमठ बेळगावचे प.पू. श्री गुरुसिद्ध महास्वामीजी आणि हुक्केरीचे प.पू. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. याच दिवशी सायंकाळी श्री महालक्ष्मी रथावरून उतरून गदगेवर विराजमान होणार आहे. तिसऱ्या दिवशी दि. 24 एप्रिल रोजी ग्रामस्थ आणि भक्तांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून यानिमित्त सकाळी 9 वाजता आयोजित विशेष समारंभाला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चौथ्या दिवशी शुक्रवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता गावातील दैवतांकडून श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यांची ओटी भरणेचा कार्यक्रम होईल. याच दिवशी सायंकाळी 4 वाजता प्रमुख पाहुणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत विशेष समारंभ पार पडेल. त्यानंतर पुढे दि. 26, 27, 28 व 29 एप्रिल रोजी ओटी भरणे कार्यक्रमासह नाटक, भजन यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री महालक्ष्मी देवीचे होन्नाट खेळत सिमोल्लंघन करण्याद्वारे यात्रेची सांगता होईल.
सदर यात्रोत्सवादरम्यान माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, विधान परिषदेचे माजी प्रमुख सचेतक महांतेश कवटगीमठ, माजी खासदार मंगला सुरेश अंगडी, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, युवा नेते मृणाल हेब्बाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. ईश्वरप्पा गडेद, हेस्कॉम ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद करूर आणि मारीहाळचे सीपीआय मंजुनाथ नाईक यांचा जाहीर सत्कार केला जाणार असल्याचे सांगून सदर यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या जय्यत तयारीची माहिती सतीश शहापूरकर यांनी शेवटी दिली.
यावेळी यात्रोत्सवाची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले. पत्रकार परिषदेस शिंदोळी गावातील प्रमुख नागरिकांसह यात्रा कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.