बेळगाव लाईव्ह :शिंदोळी (ता. जि. बेळगाव) गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवी, श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यांच्या संयुक्त यात्रोत्सवाला आज मंगळवारपासून अपूर्व उत्साहात भक्तिभावाने प्रारंभ झाला आहे.
शिंदोळी गावातील गुरुजन, समस्त नागरिक आणि यात्रा कमिटीतर्फे आयोजीत सदर संयुक्त यात्रा उत्सवाची सुरुवात आज सकाळी 6 वाजता अक्षता रोपण अर्थात देवीच्या विवाहाने झाली. याप्रसंगी गावातील पंच कमिटी आणि यात्रोत्सव कमिटीचे सदस्य अशी ठराविक मंडळी उपस्थित होती.
त्यानंतर पुनश्च एकदा सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास बडेगोळ्ळमठाचे प.पू. नागाप्पा महास्वामीजी, शगनमट्टीचे प.पू. रुद्रय्या महास्वामीजी यांच्या सानिध्यात निमंत्रित पाहुणे मंडळी आणि समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत देवीचा विवाह सोहळा पार पडला.
या सोहळ्यानंतर बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव आदी मान्यवरांनी शिंदोळी गावाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. आता सायंकाळी देवी मंदिरातून उठून होन्नाट खेळणार असून त्यानंतर रात्री 8 -8:30 वाजण्याच्या सुमारास ती रथात विराजमान होणार आहे.
या कार्यक्रमानंतर उद्या बुधवारी सकाळी 8 वाजता गावात सवाद्य रथोत्सव निघणार आहे. या रथोत्सवाचा शुभारंभ कारंजीमठाचे प.पू. श्री गुरुसिद्ध महास्वामीजी यांच्या सानिध्यात महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते होणार आहे. रथोत्सवानंतर उद्या सायंकाळी श्री महालक्ष्मी देवी रथावरून उतरून गदगेवर विराजमान होणार आहे.
परवा गुरुवारी 24 एप्रिल रोजी ग्रामस्थ आणि भक्तांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून यानिमित्त सकाळी 9 वाजता आयोजित विशेष समारंभाला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता गावातील दैवतांकडून श्री दुर्गादेवी आणि श्री मसणाई देवी यांची ओटी भरणेचा कार्यक्रम होईल. याच दिवशी सायंकाळी 4 वाजता प्रमुख पाहुणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत विशेष समारंभ पार पडेल.
सदर यात्रोत्सव येत्या बुधवार दि 30 एप्रिल पर्यंत चालणार असून यादरम्यान एप्रिल रोजी ओटी भरणे कार्यक्रमासह नाटक, भजन यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी 30 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री महालक्ष्मी देवीचे होन्नाट खेळत सिमोल्लंघन करण्याद्वारे यात्रेची सांगता होणार आहे.