बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर कर्नाटक सरकारने केलेली हद्दपारीची कारवाई तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत नामदार हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर करण्यात आले.
शुभम शेळके यांच्यावर कर्नाटक सरकारने हद्दपारीची प्रक्रिया सुरू केली असून, याला सीमाभागातून तीव्र विरोध होत आहे.
या कारवाईमुळे मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून, तीव्र नाराजी व्यक्त होत असून ही कारवाई मागे घेण्यात यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करावा, या मागणीचं निवेदन नामदार हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आज सादर करण्यात आलं.
या वेळी विजय देवणे, संजय पवार, प्रकाश शिरोळकर, अवधूत साळोखे, अशोक डोळेकर, महेंद्र जाधवकर, राजू जाधव, रमेश माळवी, दत्ताजी टिपुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान सोमवारी सायंकाळी बेळगाव पोलीस उपायुक्त त्यांच्यासमोर शेळकेच्या हद्दपारी प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शुभम शेळके यांची बाजू वकील महेश बिर्जे मांडणार आहेत त्यामुळे या सुनावणीत पुढील तारीख पडणार की कोणता निर्णय होणार याकडे बेळगाव सहज सीमा भागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही सुनावणी होणार आहे.