बेळगाव लाईव्ह: विविध देणगीदारांच्या माध्यमातून शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कारंजी मठाचे प.पू. श्री गुरुसिद्ध स्वामीजी, हुक्केरी मठाचे प.पू. श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, उद्योजक दिलीप चिटणीस आणि हिंडलगा कारागृहाचे अधीक्षक कृष्णमूर्ती उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते फीत कापण्याबरोबरच दीप प्रज्वलन करून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांची समयोचित शुभेच्छा पर भाषणे झाली उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून प्रमुख पाहुण्यांसह शांताई वृद्धाश्रमाचे संस्थापक विजय पाटील यांच्या मातोश्री आणि आश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे कुटुंबीय यांचा खास सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सदाशिवनगर स्मशानभूमीचे कर्मचारी शंकर कोलकार आणि नावगे गावातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
उद्घाटन समारंभाची सांगता सामाजिक कार्यकर्ते ॲलन मोरे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. याप्रसंगी शांताई वृद्धाश्रमाच्या संचालकांसह डॉ. रोहित राज, अनुजा जाधव, दयानंद कदम आदींसह निमंत्रित मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये शांताईमधील आजा-आजींसह वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच महिला भजनी मंडळाचा सहभाग होता.
उद्घाटनापूर्वी बेळगाव लाईव्हशी बोलताना शांताई वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे म्हणाले की, शांताई वृद्धाश्रम गेल्या 26 वर्षापासून समाजातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांची निरंतर सेवा करत असून हा आश्रम यंदा 27व्या वर्षात पदार्पण करत आहे. या संपूर्ण कालावधीत दरवर्षी शांताई वृद्धाश्रमातर्फे रद्दीतून बुद्धीकडे, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, बेवारसांवर अंत्यसंस्कार, गरजू रुग्णांना सहाय्य वगैरे विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात.
आता शांताई वृद्धाश्रमाच्यावतीने आम्ही आणखी एक नवा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत जी मुले वृद्धापकाळात शरीर साथ देत नसलेल्या आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांना आपल्यासोबत दूर सहल अथवा पर्यटनाला नेऊ शकत नाहीत. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही शांताई वृद्धाश्रमामध्ये 5 पंचतारांकित आलिशान खोल्या बांधल्या आहेत. दूर अंतरावरील दहा-पंधरा दिवसांच्या सहल अथवा पर्यटनाला गेलेल्या मुलांच्या वयोवृद्ध आई-वडिलांना राहण्यासाठी त्यांची देखभाल करण्यासाठी या आलिशान खोल्यांचा वापर केला जाणार आहे.
थोडक्यात मुले सहल -पर्यटनास गेल्यामुळे या खोल्यांमध्ये तात्पुरत्या आश्रयास येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची त्यांच्या मुलांऐवजी आम्ही 10 -15 दिवस सेवा करणार आहोत असे सांगून सदर खोल्या व्हीआरएल, पॉलिहायड्रॉन फाउंडेशन, ओरियन बालाजी अशा विविध देणगीदारांच्या माध्यमातून उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती माजी महापौर विजय मोरे यांनी शेवटी दिली.