बेळगाव लाईव्ह : भांडुरा नाल्याचे पाणी धारवाड जिल्ह्यात वळवण्यासाठी खानापूर येथील उपजाऊ जमिनींचे स्वाधीनकरण करण्याची तयारी कर्नाटक सरकारकडून सुरू झाली आहे. याला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला असून, पर्यावरणाचा होणारा मोठा धोका अधोरेखित करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारकडून त्यांच्या जमिनींच्या स्वाधीनकरणाबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. भांडुरा नाल्याचे पावसाचे पाणी मोठ्या पाइपद्वारे धारवाड जिल्ह्यातील गावांना वळवण्याची योजना आखण्यात आली असून, यासाठी खानापूरमधील उपजाऊ शेतीभूमी ताब्यात घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
या योजनेमुळे खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. याशिवाय या पाण्यावर अवलंबून असलेले जंगल नष्ट होण्याची शक्यता असून, त्यामुळे उत्तर कर्नाटकातील पावसाचे प्रमाण कमी होईल व वाळवंटीकरणाचे संकट निर्माण होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
“खानापूर वाचवा, पाऊस वाचवा, शेतकरी वाचवा” या घोषणांनी नागरिकांमध्ये एकजूट होत आहे. या विषयावर व्यापक चर्चा व पुढील उपाययोजना ठरवण्यासाठी येत्या 9 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता वागळे कॉलेज, खानापूर (बस स्थानकासमोर) येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. जात, धर्म, भाषा, पक्ष या सर्व भेदाभेदांना बाजूला ठेवून नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या बैठकीचे आयोजन दिलीप कामत, डॉ. शिवाजी कागणीकर, सुजित मुळगुंद, कॅप्टन नितिन धोंड, नागप्पा लातूर, जगदीश होसमनी, मल्लिकार्जुन वाली, सिद्धगौडा मोदगी, शारदा गोपाळ, गीता साहू, काशीनाथ नाईक, शंकरण्णा लंगटी, बसनागौडा पाटील आणि विल्सन कार्व्हालो यांनी केले असून अधिक माहितीसाठी कॅप्टन नितिन धोंड : 9986901212 आणि सुजित मुळगुंद : 70261 27479 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.