बेळगाव लाईव्ह :राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री मुरूगेश निराणी यांनी वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा जो विचार मांडला होता आणि त्यावर त्यावेळी चर्चा देखील झाली होती. आता पुन्हा एकदा ती चर्चा जोर धरू लागली असून बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वरील प्रमाणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी उचलून धरत तशी विनंती केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांना केली आहे.
बेंगलोर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जोडीला राज्यामध्ये आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे असा विचार पुढे येऊ लागला आहे राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील या विचाराला पाठिंबा देऊन आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
विद्यमान कामगार मंत्री एम बी पाटील यांनी उत्तर कर्नाटकामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे असे मत व्यक्त केले असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनीही हुबळी धारवाड आणि बेळगाव दरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात यावे अशी या भागातील जनतेची महत्त्वाची मागणी असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर मागणी आता जोर धरू लागली आहे.
बेळगाव महानगर हे कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यांचे मध्यवर्ती संपर्क केंद्र आहे. बेळगाव शहरात सुवर्ण विधानसौध असून बेळगाव हे राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक शहर असलेल्या बेळगावची स्वातंत्र्यपूर्व काळापासून जागतिक पटलावर ओळख आहे.
महात्मा गांधीजी यांनी काँग्रेस अधिवेशन घेतलेली ही पुण्यभूमी आहे. रामायणातील शबरीचे हे माहेरघर आहे. वीर राणी कित्तूर चन्नम्मा क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या शौर्य, साहसाचा गौरवशाली इतिहास बेळगाव जिल्ह्यातच लिहला गेला. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले पाहिजे ही मागणी समर्पकच आहे. उत्तर कर्नाटका बेरोजगारांची संख्या वाढली आहे.
या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्यासाठी बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे अशी विनंती बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय मंत्री माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना केली आहे. या पद्धतीने या भागातील युवकांच्या उज्वल भविष्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून केले जाणारे प्रयत्न स्वागतार्ह आहेत.