बेळगाव लाईव्ह :सौंदत्ती डोंगरावरील श्री रेणुका देवस्थान परिसरात पोलीस बंदोबस्तात हाती घेण्यात आलेल्या अनाधिकृत दुकानांविरुद्धच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला तीव्र विरोध झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली. मात्र या घटनेमुळे डोंगरावर कांही काळ गोंधळाचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
सौंदत्ती येथील श्री यल्लमा डोंगरावरील श्री रेणुका देवी देवस्थान परिसरातील अतिक्रमित दुकाने, पूजा साहित्य विक्रीचे स्टॉल्स हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तथापि श्री रेणुका यल्लमा अभिवृद्धी प्राधिकरणाचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या आदेशावरून हाती घेण्यात आलेल्या या मोहिमेला संबंधित दुकानदार आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध केल्याची घटना आज सकाळी घडली मोठ्या संख्येने जमलेल्या या संतप्त लोकांनी अनाधिकृत दुकाने, स्टॉल्स हटवण्याचा आदेश देणाऱ्या आयुक्त दूडगुंटी यांच्या कार्यालयाला घेराव घातला.
यावेळी देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात धावपळ उडवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कांही संतप्त दुकानदारांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही या ठिकाणी आमचा व्यवसाय करत आहोत. मात्र अचानकपणे आमची दुकाने आज हटवली जात आहेत.
याला आमचा विरोध असून ही मोहीम तात्काळ थांबवावी. तसेच जोपर्यंत आमची दुकाने हटवण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या पदावरून हटवले जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असे स्पष्ट केले. दरम्यान देवस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमल्यामुळे वातावरण तापले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली होती.