बेळगाव लाईव्ह : काँग्रेसचे राज्य प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला यांनी देशाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारच्या काळातच देशात दहशतवादी हल्ले का घडतात, असा थेट सवाल त्यांनी केला.
काँग्रेसच्या संविधान बचाव आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सुरजेवाला म्हणाले, “भाजप आणि दहशतवाद्यांमध्ये काही संबंध आहेत का, असा संशय आता देशातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. केंद्रात भाजप सत्तेत असताना संसद भवनावर हल्ला झाला, पठाणकोट, उरी, नगरोटा, अमरनाथ यात्रा आणि पुलवामा येथे भीषण दहशतवादी हल्ले झाले. याची जबाबदारी कोण घेणार?” केंद्र सरकार झोपेत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पहलगाममध्ये कर्नाटकातील पर्यटकांवर देखील दहशतवादी हल्ला झाला असून, यामध्ये सुरक्षेतील अपयश स्पष्टपणे दिसते. भाजप सरकारला हे अपयश ४-५ कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सभेत घोषणाबाजीसाठी पाठवून झाकता येणार नाही, असे सुरजेवाला म्हणाले.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे पंतप्रधान पाहायला मिळाले, ज्यांनी कोणतेही औपचारिक आमंत्रण नसतानाही पाकिस्तानला भेट दिली. त्याच मैत्रीच्या भेटीच्या परिणामी पाकिस्तानने पठाणकोटवर दहशतवादी हल्ला घडवला, अशी टीका त्यांनी केली.
सुरजेवाला यांनी भाजप आणि आरएसएसवरही निशाणा साधला. पहलगाममधील सुरक्षेच्या अपयशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, बेसरन मैदान वर्षभर पर्यटकांसाठी खुले असताना पुरेशी सुरक्षा का ठेवली नव्हती? पहलगाममध्ये तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था असायला हवी होती, ती का नव्हती?
असा सवाल उपस्थित करत, गुजरातमध्ये २१ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त झाले असून, ते पहलगाम फोर्टमार्गे आणले गेल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. दहशतवाद्यांविरुद्ध कठोर उपाययोजना झाल्यास काँग्रेस त्याला पूर्ण पाठिंबा देईल, असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.