बेळगाव लाईव्ह : १४ वर्षांनंतर शिंदोळीतील श्री महालक्ष्मी यात्रा धूमधडाक्यात सुरू झाली आहे. आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी शिंदोळीमध्ये दिसून येत आहे. मात्र, भाविकांची अलोट गर्दी त्यात वळिवाच्या पावसाची वादळी वारा आणि गारपिटीसह हजेरी आणि यामुळे उन्मळून पडलेले वृक्ष. परिणामी तब्बल ४ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
शिंदोळी महालक्ष्मी यात्रेला आज हजारो भाविकांनी उपस्थिती लावली असून, सकाळपासूनच मुतगा, सांबरा आणि शिंदोळीच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहने निघाल्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सांबरा परिसरात गारांचा पाऊस झाला होता.
वाहनांच्या चार किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या असून, काही ठिकाणी रस्त्यांवरच वाहने थांबवावी लागली. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अचानक वळवाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असून, वीज खांबही कोलमडल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
या वाहतूक कोंडीमुळे यात्रेकरूंना शिंदोळी गाठण्यात मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. महिलावर्ग, वृद्ध भाविक आणि लहान मुलांना विशेष अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्या असल्या तरी गर्दीच्या प्रमाणात त्या अपुऱ्या ठरत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, अशीच परिस्थिती मागील वर्षी सांबरा गावच्या महालक्ष्मी यात्रेतही निर्माण झाली होती.
तेव्हाही वळवाच्या पावसाने यात्रोत्सवात अडथळा आणला होता. यंदा पुन्हा शिंदोळीतील यात्रोत्सवात तशीच स्थिती अनुभवायला मिळत असून वळिवाच्या दणक्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक प्रशासन, वाहतूक विभाग आणि स्वयंसेवी संस्था मिळून वाहतुकीला गती देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून आले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात येत आहे.
