बेळगाव लाईव्ह : पिरनवाडी, तालुका बेळगाव येथे ड्रेनेज पाइपच्या वादातून मारहाण होऊन गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष दर्शी साक्षीदारांच्या साक्षांमध्ये विरोधाभास आढळल्याने दुसऱ्या जेएमएफसी न्यायालयाने आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे.
पिरनवाडी येथील मारुती पुंडलीक सुतार (वय ३६), आकाश परशुराम सुरतेकर (वय २६), व प्रकाश परशुराम सुरतेकर (वय २३) या तिघांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ सह कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी सुरेखा कृष्णा गुरव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ७ मे २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पती कृष्णा गुरव हे आरोपींकडे ड्रेनेज पाइप पुन्हा बसवून देण्याची मागणी करण्यासाठी गेले होते.
यावेळी आरोपींनी पाइप देण्यास नकार देत वाद घालत कृष्णा यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल झाली.
सरकारी पक्षाने न्यायालयात साक्षी, दस्तऐवज व पुरावे सादर केले. परंतु प्रत्यक्षदर्शी साक्षींमध्ये विसंगती आढळून आल्यामुळे न्या. दुसरे जेएमएफसी यांनी तिन्ही आरोपींना निर्दोष घोषित केले. या खटल्यात आरोपींची बाजू अॅड. मारुती कामाण्णाचे यांनी मांडली.