बेळगाव लाईव्ह :जम्मू -काश्मीर मधील दहशतवादी हल्ला हा नागरिकांवरील किंवा पर्यटकांवरील हल्ला नाही तर आमच्या देशाच्या एकता, अखंडते वर हल्ला आहे. तेंव्हा जे कोणी या कृत्याला जबाबदार आहेत त्यांना रस्त्यावर भर चौकात गोळ्या घालाव्यात, असे संतप्त मत बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी व्यक्त केले.
शहरातील आपल्या कार्यालयामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आमदार सेठ म्हणाले की, जम्मू -काश्मीर मधील पेहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो आणि केंद्र सरकारला विनंती करतो की हे कृत्य करणाऱ्यांना शोधून काढून गोळ्या घालाव्यात.
हा फक्त आमच्या नागरिकांवर आणि पर्यटकांवरील हल्ला नव्हे तर आपल्या देशावरील हल्ला आहे. हल्लेखोरांना सोडता कामा नये, त्यांनी आमच्या देशाच्या एकता, अखंडते वर हल्ला केला आहे. त्यामुळे जे कोण या हल्ल्याला कारणीभूत आहेत त्यांना रस्त्यावर भर चौकात गोळ्या घातल्या गेल्या पाहिजेत किंवा फाशी दिली पाहिजे.
कोणतीही जात अथवा धर्म निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून त्यांची हत्त्या करा, असे शिकवत नाही. मी काँग्रेस पक्ष, बेळगावची समस्त जनता आणि अंजुमन इस्लामतर्फे याचा निषेध करतो. तसेच मृतांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहे.
त्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही आणि संपूर्ण देश उभा आहे. ही अतिशय निंदनीय घटना आहे. तेंव्हा केंद्र सरकारला माझे आवाहन आहे की यासंदर्भात कठोर पावले उचलून दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला चोख उत्तर द्यावे, असे आमदार असिफ सेठ शेवटी म्हणाले.
