बेळगाव लाईव्ह : बेळगावची शिवजयंती ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वैभवशाली परंपरा लाभलेला उत्सव मानली जाते. गेल्या १०६ वर्षांपासून शिवप्रेम आणि सांस्कृतिक श्रद्धेचं प्रतीक म्हणून ही परंपरा अखंड सुरू आहे. मात्र, या उत्सवाच्या पारंपरिक स्वरूपाला अलीकडच्या काळात डॉल्बी आणि ढोलपथकांच्या दणदणाटाने सुरुंग लावला आहे, असं चित्र दिसत आहे. विशेषतः चित्ररथ मिरवणुकीमध्ये सादर होणाऱ्या शिवकालीन देखाव्यांवर याचा थेट परिणाम होत आहे.
प्रत्येक शिवजयंतीला बेळगावातील विविध गल्ली मंडळांमार्फत सुमारे ५० ते ६० चित्ररथ सजवले जातात. या चित्ररथांमध्ये शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग, युद्धदृश्ये, समाजप्रबोधनपर संदेश सादर केले जातात. एका देखाव्यात किमान २५ ते १५० कलाकार सहभागी होतात. त्यांची संवादफेक, अभिनय आणि सादरीकरण या उत्सवाची खरी ओळख आहे. मात्र, डॉल्बी आणि ढोल पथकांच्या प्रचंड आवाजात हे संवाद ऐकूच येत नाहीत. परिणामी, कलाकारांचा परिश्रम आणि संपूर्ण संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही.
शिवप्रेमींना चित्ररथांवरून दाखवले जाणारे संवाद ऐकता यावेत यासाठी डॉल्बीचा वापर कमी करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. यंदाच्या वर्षी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत देखील अनेक कार्यकर्त्यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवले. मंडळांनी याविषयी पुढाकार घेत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून, “डॉल्बी मुक्त शिवजयंती” साजरी करण्याची चळवळ उभारी घेत आहे.
डॉल्बी आणि ढोल पथकांमुळे केवळ आवाजच नव्हे, तर मिरवणुकीच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. अनेकदा देखावे सादर करण्यासाठी जागा मिळत नाही, परिणामी कलाकारांना रस्त्यांवरच आपली कलाकृती सादर करावी लागते. त्यामुळे रहदारी विस्कळीत होते आणि चेंगराचेंगरीचे प्रसंगही घडू शकतात. शिवजयंतीसारख्या शांततामय आणि सांस्कृतिक कार्यक्रमात अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी नियोजन आणि नियंत्रण गरजेचं आहे.
मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गल्ल्यांतील कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे मत नोंदवलं आहे की, डॉल्बीच्या वापरामुळे मूळ हेतूच हरवत चालला आहे. याऐवजी शिस्तबद्ध, संवादप्रधान आणि कलात्मक पद्धतीने मिरवणूक पार पाडली पाहिजे. “डॉल्बी हटवा – देखावे वाचवा” हे शिवप्रेमींचं स्पष्ट आवाहन आहे. अनेकांनी प्रत्यक्ष मंडळात जागरूकता उपक्रम हाती घेण्यास सुरुवात केली आहे.
शिवजयंती उत्सव हा नुसता जल्लोष नव्हे, तर इतिहास, अभिमान आणि प्रेरणेचं प्रतीक आहे. त्यामुळे, केवळ दिखाऊपणासाठी किंवा स्वतःच्या गटाचे वर्चस्व दाखवण्यासाठी होणारा डॉल्बीचा वापर संपूर्ण उत्सवाची शालीनता आणि अर्थच हरवत आहे. डॉल्बीचा पूर्ण वापर थांबवता आला नाही तरी निदान नियंत्रित स्वरूपात त्याचा वापर करावा, अशी विनंती शिवप्रेमीं करताना दिसत आहेत. मध्यवर्ती मंडळांनी यासंदर्भात लवकरच अधिकृत निर्णय जाहीर करावा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथके नेमावीत, ही काळाची गरज आहे. डॉल्बीविना शांत, सुसंस्कृत आणि प्रेरणादायी शिवजयंतीच खरं शिवभक्तीचं प्रतीक ठरेल.