बेळगाव लाईव्ह :कुस्ती मैदानाप्रसंगी पैलवानांकडून केले जाणारे गैरवर्तन, तसेच अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व कुस्ती मैदान आयोजकांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली सर्वसमावेशक बेळगाव जिल्हा कुस्तीगीर शिखर संघटना स्थापन झाली पाहिजे आणि त्यासाठी आमची जिल्हा संघटना पुढाकार घेण्यास तयार आहे, असे मत बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे यांनी व्यक्त केले.
कुस्ती मैदानांची वाढती संख्या, जुन्या तालमीचे झालेले पुनरुज्जीवन आणि त्यामध्ये सराव करणाऱ्या पैलवानांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे बेळगाव मधील कुस्ती क्षेत्राला पुन्हा एकदा चांगले दिवस आले. या पार्श्वभूमीवर कुस्तीशी संबंधित विविध पैलूंवर आज सुधीर बिर्जे बेळगाव लाईव्ह समोर आपले मत व्यक्त करत होते. गेल्या महिन्यात बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजीत केलेले आंतरराष्ट्रीय तोडीचे जंगी कुस्ती मैदानाबद्दल बोलताना हे मैदान यशस्वी होण्यास सांघिक कार्य कारणीभूत होते.
या खेरीज आम्ही मागील चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेत लहान लहान गोष्टींमध्ये सुधारणा केल्यामुळे ते मैदान उत्तम प्रकारे पार पडले. सदर मागील महिन्यात भरवलेले कुस्ती मैदान फक्त कर्नाटक राज्यातीलच नव्हे तर दक्षिण भारतातील यंदाचे सर्वोत्कृष्ट मैदान असल्याची पोचपावती खुद्द कुस्ती शौकिनांकडूनच मिळत आहे, असे सुधीर बिर्जे यांनी सांगितले.
कुस्ती मैदानादरम्यान होणाऱ्या कांही पैलवानांच्या गैरवर्तनांसह इतर गैरप्रकार घडत असतात किंवा मैदानादरम्यान कांही अडचणी उद्भवत असतात. या सर्वांवर मात करण्यासाठी बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात ठीक ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्ती मैदानांच्या आयोजकांमधील निवडक अनुभवी एका -दोघांना घेऊन जिल्ह्यामध्ये कुस्ती संघटनांची एक शिखर संघटना निर्माण होणे गरजेचे आहे. याला सर्वांची संमती असल्यास या कामी आम्ही पुढाकार घेण्यास तयार आहोत, असे बिर्जे यांनी पुढे सुचविले.
कुस्ती मैदानाप्रसंगी काही पैलवानांकडून पंचांसोबत अरेरावीचे वर्तन केले जाते त्याबद्दल आपले मत व्यक्त करताना कुस्ती मैदानासाठी केलेली पंचांची नियुक्ती ही त्यांचा कुस्ती मधील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन केलेली असते त्यामुळे त्यांचा मान राखला गेला पाहिजे. तसेच पैलवानाच्या अंगात कितीही ताकद असली तरी वागण्यामध्ये विनम्रता असली पाहिजे. मनुष्य असल्यामुळे पंचांकडूनही क्वचित एखादी चूक होऊ शकते हे पैलवानांनी ध्यानात घेतले पाहिजे. कुस्तीसाठी कमावलेल्या ताकदीचा किंवा शरीराचा पैलवानांनी गैरवर्तनासाठी वापर करू नये. यासाठी पैलवानांना माझे आवाहन आहे की कुस्तीमध्ये एखादा निर्णय तुमच्या विरोधात जरी लागला तरी स्वतःचा संयम ढळू देऊ नये. कारण ती कुस्ती म्हणजे जीवनातील आपली शेवटची कुस्ती नाही हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
या खेरीज कुस्ती मैदानात बक्षीस रकमेवरून पैलवानांकडून हुज्जत घालण्याचा प्रकार घडतो तो देखील चुकीचा आहे. कुस्ती मैदान भरून पैलवानांना त्यांच्या कुस्ती कौशल्याचे चीज होईल असे रोख बक्षीस देण्यासाठी आयोजकांची धडपड असते. त्यासाठी मैदानाच्या आधी दोन-तीन महिने ते सतत धडपड करून परिश्रम घेत असतात याचे भान पैलवानांनी बाळगले पाहिजे असे बिर्जे यांनी सांगितले.
बहुतांश कुस्ती मैदाने वेळेत समाप्त न होता रात्री उशिरापर्यंत लांबतात या संदर्भात बोलताना सुधीर बिर्जे यांनी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना या संदर्भात गांभीर्याने विचार करत असून पुढील वर्षापासून आमचे कुस्ती मैदान उशीर न होता वेळेत पार पाडण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे स्पष्ट केले.
