बेळगाव लाईव्ह :बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरील नौगोबा (रेणुका देवी) यात्रेसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिवाजीनगर येथील जागेमध्ये बांधण्यात येणाऱ्या मंदिराचा भूमिपूजन समारंभ आज सोमवारी सकाळी बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके, शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक -अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते विधिवत उत्साहात पार पडला.
गेल्या अनेक वर्षापासून मध्यवर्ती बस स्थानक परिसरात नौगोबा यात्रा आयोजित केली जात होती. मात्र परिवहन मंडळाने या ठिकाणी आधुनिक नूतन बस स्थानक उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी यात्रा भरवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात शहर देवस्थान मंडळ आणि माजी आमदार अनिल बेनके यांनी काही महिने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अलीकडे शिवाजीनगर येथील पेट्रोल पंपासमोरील कॅन्टोन्मेंटच्या जागेमध्ये यात्रेसाठी 22 बाय 77 आकाराची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेत उभारण्यात येणाऱ्या श्री नौगोबा मंदिराचा भूमिपूजन समारंभ आज सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला. याप्रसंगी शहर देवस्थान समितीचे पदाधिकारी, सदस्य, श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार बेनके यांचे पाठीराखी आणि भक्त मंडळी उपस्थित होती.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, गेल्या 3-4 वर्षांपासून नौगोबा यात्रा (रेणुका देवी गदगा) भरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवर सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर पावले उचलल्यानंतर आम्हाला आमच्या नौगोबा यात्रेसाठी जागा मिळाली आणि आज मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ झाला आहे. यासोबतच, मराठा लाईट इन्फंट्रीने परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा केली आहे.

शेकडो वर्षांपासून आई यल्लम्मा (रेणुका देवी) यात्रा बेळगावातील केएसआरटीसी बस स्थानकात भरत होती असे सांगून बस स्थानक येथे पालखीसह आणि हिंदू धार्मिक परंपरेनुसार यात्रा भरवण्यात येत होती. संरक्षण खाते आणि राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने आम्हाला आमची हक्काची जागा मिळाली असून बेळगावचे लोक आनंदी आहेत. या यात्रेनिमित्त बेळगावचे लोक एकत्र येतात आणि आपला वारसा जपतात असे माजी आमदार बेनके यांनी सांगितले.
यावेळी रणजीत चव्हाण -पाटील बोलताना म्हणाले की, शहर देवस्थान मंडळाच्यावतीने गेली दोन वर्ष पूर्वी जी जागा निश्चित करण्यात आली होती ती जागा लष्कर आणि परिवहन मंडळाने देवस्थान मंडळाच्या हाती दिली आहे. पूर्वीच्या नकाशा प्रमाणे दोन गुंठे जागा 25 X 77 ची जागा आम्हाला मिळालेली आहे. ही जागा मिळवण्यासाठी अनिल बेनके यांनी अथक प्रयत्न घेतले आहेत.
बेंगलोरच्या अधिकाऱ्यांना बेळगावला घेऊन येऊन जागेचा सर्व्हे केला होता. त्यामुळे याचे भरपूर श्रेय माजी आमदार अनिल बेनके यांना जाते. रमाकांत कोंडुसकर, परशराम माळी, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी या सर्वांच्या मदतीने आज आम्ही जागा मिळवून भूमिपूजन करण्यापर्यंत पोहोचलो आहोत. लवकरच इथे चार गदगा व लहान मंदिर होणार आहे. एकंदर प्रत्येक वेळी लष्कराकडून परवानगी घेण्याची तसदी यापुढे घ्यावी लागणार नाही.
श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक -अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, नौगोबा यात्रा बस स्थानकाच्या ठिकाणी जिथे होत होती तिथे स्मार्ट सिटीने इमारत उभारली आहे. इमारतीच्या आत मंदिर असल्याकारणाने नौगोबा यात्रेदिवशी भक्तांची गैरसोय होत होती. अनिल बेनके आमदार असताना यांनी रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली याचा पाठपुरावा केला. नौगोबा यात्रा व्यवस्थितरित्या पार पडावी व भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अनिल बेनके यांनी पाठपुरावा केला. ही जागा कायमस्वरूपी आम्हाला मिळालेली आहे.
गदगा बांधून देतो असे आश्वासन बस स्थानक इमारत उभारणारे कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी दिले आहे अशी माहिती देऊन त्याचा आज भूमिपूजनाने शुभारंभ होत आहे असे कोंडुसकर यांनी सांगितले. यावेळी शहर देवस्थान समितीचे कार्यदर्शी परशराम माळी, विजय तंबुचे आदी उपस्थित होते.